मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेनं शस्त्र नसलेल्या मिनिटमन-3 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. याबाबत अमेरिकेच्या स्पेस फोर्स कमांडकडून माहिती देण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कॅलिफोर्नियातील वँडेनबर्ग एअर फोर्स बेसवरून अमेरिकेनं या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. मिनिटमन-3 हे क्षेपणास्त्र आपल्यासोबत अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. तसेच या मिसाईलचं आणखी एक मुख्य वैशिष्ट म्हणजे ही मिसाईल 14000 किमी दूरपर्यंत मारा करू शकते. या क्षेपणास्त्राची चाचणी ही जीटी 254 चा एक भाग होती, तसेच याचा उद्देश हा ऑपरेशनची तयारी आणि आयसीबीएम प्रणालीची विश्वासार्हता तपासणे असल्याची माहिती देखील अमेरिकेच्या स्पेस फोर्स कमांडकडून देण्यात आली आहे.
या क्षेपणास्त्राच्या परीक्षणाची सुरुवात ही एअरबोर्न लाँच कंट्रोल सिस्टमच्या चाचणीने करण्यात आली. 625 व्या स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स स्क्वॉड्रनच्या टीमने ही चाचणी केली. एअरबोर्न लाँच कंट्रोल यंत्रणा ही क्षेपणास्त्र कमांड आणि कंट्रोलसाठी बॅकअप म्हणून काम करते. ही चाचणी केवळ क्षेपणास्त्राची चाचणी नव्हती, तर संपूर्ण आयसीबीएम यंत्रणेच्या क्षमता तपासण्यासाठीची ही चाचणी होती, अशी माहिती यावेळी बोलताना फ्लाइट टेस्ट स्क्वॉड्रनचे कमांडर लेफ्टनंट कर्नल कॅरी रे यांनी दिली.
या शस्त्र नसलेल्या मिनिटमन-3 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने जवळपास 6759 किमी अंतर पार केलं. हे मिसाईल मार्शल बेटांमधील रोनाल्ड रेगन बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण चाचणी स्थळापर्यंत पोहोचले, तिथे रडार आणि सेन्सरचा वापर करून या मिसाईलचा डेटा गोळा करण्यात आला. या मिसाईलच्या चाचणी प्रक्रियेमध्ये एअरफोर्स कमांडच्या तीन्ही मिसाईल विंगचे एअरमन आणि वायोमिंगच्या F.E. वॉरेन एअरफोर्स बेसचा मेंटेंनंस स्टाफ सहभागी झाला होता. अमेरिकेकडून करण्यात आलेली मिनिटमन-3 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची ही चाचणी केवळ क्षेपणास्त्राची चाचणी नसून, तर याचा मुख्य उद्देश हा ऑपरेशनची तयारी आणि आयसीबीएम प्रणालीची विश्वासार्हता तपासण्याचा देखील होता. ही चाचणी यशस्वी ठरली आहे. या क्षेपणास्त्रानं तब्बल 6759 किलोमीटरचं अंतर पार केलं आहे.