WDMMA Ranking : इंडियन एअरफोर्स जगातील तिसरं शक्तीशाली हवाई दल ठरताच चीनचा नुसता जळफळाट,कमी पण दाखवण्यासाठी म्हटलं की…
Tv9 Marathi November 06, 2025 10:45 AM

Indian Air Force Ranking : सैन्य क्षमतेचा विषय निघाल्यानंतर आपल्या डोक्यात नेहमी पाकिस्तान असतो. आपण पाकिस्तानपेक्षा किती पुढे आहोत किंवा मागे? अहो, पण एक आनंदाची बातमी आहे. भारताच्या हवाई दलाने चीनवर मात केली आहे. वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉर्डन मिलिट्री एअरक्राफ्टची (WDMMA) नुकतीच रँकिंग जाहीर झाली. त्यात इंडियन एअर फोर्स जगातील तिसरं शक्तीशाली हवाई दल ठरलं आहे. चीन भारताच्या मागे चौथ्या स्थानावर आहे. टॉप पोजिशनवर अजूनही अमेरिकेचा दबदबा कायम आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरवर रशियन एअरफोर्स आहे. चीनची घसरण चौथ्या स्थानावर झाली आहे. त्याआधी चीन तिसऱ्या नंबरवर होता. चौथ्या नंबरवर भारत होता. आता भारत चीनच्या पुढे निघून गेला आहे.

भारताची हवाई शक्ती वाढणं हे आशिया खंडात सामरिक संतुलनात झालेल्या मोठ्या बदलाचा संकेत आहे. WDMMA रँकिंगमध्ये 103 देश आणि 129 एअर फोर्स आहेत. यात सैन्य, नौदलाचा सुद्धा समावेश आहे. ही रँकिंग देताना जगभरातील 48,082 विमानांचा अभ्यास करण्यात आला. सैन्य रणनिती आखताना हवाई शक्तीची महत्वाची भूमिका असते. या बाबतीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे.

भारताला किती रेटिंग मिळालय?

इंडियन एअरफोर्सची TruVal Rating (TVR) 69.4 आहे. फक्त विमानांच्या संख्येच्या आधारावर ही रेटिंग दिलेली नाही, तर आक्रमण आणि संरक्षण करण्याची क्षमता, सैन्य मदत, आधुनिकीकरण आणि संचालन प्रशिक्षण यांचं सुद्ध मुल्यांकन करण्यात आलय. भारताकडे 1,716 विमानांचा ताफा आहे. इंडियन एअरफोर्सच्या ताफ्यात 31.6 टक्के फायटर जेट्स, 29 टक्के हेलिकॉप्टर आणि 21.8 टक्के ट्रेनर एअरक्राफ्ट आहेत. इंडियन एअरफोर्स वापरत असलेली उपकरणं अमेरिका, रशिया, फ्रान्स, इस्रायल सारख्या देशांमध्ये बनवण्यात आलेली आहेत.

पाकिस्तानला संधीच दिली नाही

इंडियन एअरफोर्सची ऑपरेशनल क्षमता किती आहे? त्याचं प्रदर्शन खास करुन ऑपरेशन सिंदूरच्या वेळी दिसून आलं. मे 2025 मध्ये भारताने पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या तळांवर अचूक हवाई हल्ले केले. पाकिस्तानचं आपण किती नुकसान करु शकतो, हे इंडियन एअरफोर्सने दाखवून दिलं. पाकिस्तानला प्रत्युत्तराची कारवाई करण्याची संधी सुद्धा मिळाली नाही. त्यांचे जवळपास डझनभर एअरबेस आणि रडार स्टेशन उद्धवस्त झाले.

चिनी एअरफोर्स चौथ्या नंबरवर का गेली?

चिनी एअरफोर्सची TruVal Rating (TVR) 63.8 आहे. ते चौथ्या स्थानावर आहेत. चीनची टेक्नोलॉजी आणि एअरफोर्स ताफ्याच्या आधुनिकीकरणात मोठी गुंतवणूक कायम आहे. चीन ट्रेनिंग, हवाई मदत आणि विशेष बॉम्ब वर्षाव युनिट सारख्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहे. फक्त हवाई ताफ्याचा आकारच नाही, तर ऑपरेशनल रेडीनेस आणि रणनीतिक क्षमतांच महत्व सुद्धा यातून अधोरेखित होतं.

रशिया कितव्या स्थानावर?

अमेरिकन एअरफोर्स 242.9 TruVal Rating (TVR) सह जगात पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकन एअरफोर्समध्ये रणनितीक बॉम्बवर्षक, मल्टीरोल फायटर जेट्स, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, टँकर एअरक्राफ्ट आणि स्पेशल मिशन एअरक्राफ्ट्सचा समावेश आहे. WDMMA रँकिंगमध्ये अमेरिकन नौदल दुसऱ्या स्थानावर आहे. देशाच्या हिशोबाने ते पहिल्या स्थानावर आहेत. रशिया 142.4 TVR Rating सह दुसऱ्या स्थानावर आहे.

TrueVal Rating बद्दल जाणून घ्या

TrueVal Rating (True Value Rating) ला TVR सुद्धा म्हटलं जातं. WDMMA सारखी संस्था जगभरातील एअरफोर्सची तुलना करण्यासाठी TVR प्रोसेसचा अवलंब करते.

TVR च्या बाबतीत अनेक गोष्टींची काळजी घेतली जाते. फक्त विमानांची संख्या नाही, तर विमानांचा उपयोग, त्यांचे प्रकार (fighter, bomber, transport, Rconnaissance) अशा अनेक गोष्टी लक्षात घेतल्या जातात.

विमानांची देखभाल, लॉजिस्टिक्स, प्रशिक्षण आणि ऑपरेशन क्षमता याचा अभ्यास केला जातो.

प्रत्येक विमान टेक्निकली इतर फायटर जेट्सपेक्षा किती वरचढ आहे, याचा अभ्यास होतो.

TVR रेटिंगमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या जातात. म्हणजे एखाद्या देशाकडे कमी विमानं असतील, पण ते जास्त आधुनिक आणि क्षमतावान असतील, तर त्यांची रँकिंग चांगली असू शकते, जसं आता भारत आणि चीनच्या बाबतीत झालं.

भारताने चीनला कसं मागे टाकलं?

इंडियन एअरफोर्सने चिनी एअरफोर्सला कसं मागे सोडलं? तर रणनिती आणि सुधारणा त्यामागे आहे. इंडियन एअर फोर्सने मागच्या काही वर्षात अत्याधुनिक लढाऊ विमान आणि प्रणाली याचा अवलंब केला. यात राफेल, सुखोई Su-30MKI सारखी अत्याधुनिक विमानं, ड्रोन्स आणि टेहळणी विमानं तसच एयरोनॉटिक अपग्रेड योजना याचा समावेश आहे. जेवढी तुमच्याकडे अत्याधुनिक टेक्नोलॉजी असेल तितका तुमचा TVR उत्तम राहिलं. त्यामुळे नुसत्या विमानांच्या संख्येवर काही नसतं. पण तुमच्या टॅकटिक्स, हल्ला आणि बचाव करण्याची क्षमता सुद्धा तितकीच महत्वाची ठरते.

फायटर विमानांमुळेच तुमचा TVR सुधारत नाही

इंडियन एअरफोर्सच्या ताफ्यात संतुलित विमानांचं मिश्रण आहे. ताफ्यात फायटर जेट्स, मालवाहतूक करणारी विमानं, टेहळणी विमान, हेलिकॉप्टर्स आणि ड्रोन्सही आहेत. फक्त फायटर विमानांमुळेच तुमचा TVR सुधारत नाही.

इंडियन एअरफोर्सने काय सुधारणा केल्या?

विमानांची देखभाल, दुरुस्ती आणि स्पेयर पार्ट्सची उपलब्धता यामुळे सुद्धा एअर फोर्स अधिक प्रभावी बनते. इंडियन एअर फोर्सने या बाबतीत खूप सुधारणा केली आहे. एअरबेस नेटवर्क मजबूत बनवलं आहे. देखभाल सुधारणा, पुरवठा आधुनिक केल्या आहेत. त्यामुळे भारतीय हवाई दलाची ऑपरेशनल क्षमता वाढली आहे.

IAF पायलट्सना कसं प्रशिक्षण मिळतं?

इंडियन एअर फोर्स पायलट्सना विविध शस्त्र, तापमान, भू-आकृतिक वातावरण (हिमालयीन क्षेत्र, उंचावरील भाग) या ठिकाणी उड्डाणाच प्रशिक्षण देतात. त्यामुळे युद्धाच्या प्रसंगात पायलट जास्त सतर्क आणि कौशल्यवान बनतो.

रँकिंगमध्ये भारताला कसा फायदा झाला?

सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास इंडियन एअर फोर्सने चिनी हवाई दलाला रँकिंगमध्ये यासाठी मागे टाकलं कारण ते फक्त संख्येवर अवलंबून राहिले नाहीत, तर गुणवत्ता, विविधता, लॉजिस्टिक , प्रशिक्षण आणि औद्योगिक आधार यावर लक्ष दिलं. TrueVal Rating (TVR) मुल्यांकन करताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला. त्याचा भारताला रँकिंगमध्ये फायदा झाला.

चीनने मनातली खदखद व्यक्त करताना काय म्हटलं?

वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉर्डन मिलिट्री एअरक्राफ्ट (WDMMA) रँकिंगमध्ये भारत पुढे निघून गेल्यानंतर अपेक्षेप्रमाणे चीनला मिर्च्या झोंबल्या आहेत. ग्लोबल टाइम्स या आपल्या अधिकृत मुखपत्रातून चीनने आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे. “पेपरवरील संख्येच्या आधारावर नव्हे, तर खरी क्षमता जी आहे, त्या आधारावर सैन्याला रँकिंग दिली पाहिजे” असं चिनी एक्सपर्टच म्हणणं आहे. “ही रँकिंग गांभीर्याने घेऊ नये. कागदावरच्या संख्येऐवजी रणागणातील सैन्य क्षमता त्या आधारेच अर्थपूर्ण तुलना होऊ शकते” असं चिनी लष्करी एक्सपर्ट Zhang Junshe यांनी सांगितलं. खरंतर ऑपरेशन सिंदूरवेळी चिनी शस्त्रांची क्षमता लक्षात आली. भारताने प्रत्युत्तराच्या कारवाईत चिनी ड्रोन्स, क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केली होती. पाकिस्तानच्या बाजूला जवळपास 10 फायटर जेट्स पाडली. यात चिनी विमानं सुद्धा होती. त्यामुळे चीनला मिर्च्या झोंबणं स्वाभाविक आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.