संध्याकाळ होताच डासांचा त्रास सुरू होतो. त्याच बरोबर आता दिवसाही डासांपासून स्वत:चे संरक्षण करणे आवश्यक आहे, कारण डास हे घराच्या कोपऱ्यात लपलेले असतात. त्यात सारखे डास आजुबाजूला फिरताना दिसतात आणि चावतात. आपण मोठी माणसं डासांपासून स्वत:ला सुरक्षित तरी ठेऊ शकतो. पण लहान मुलं स्वत:चे संरक्षण करू शकत नाही म्हणून मुलं जेव्हा बागेत किंवा शाळेत जातात तेव्हा त्यांना डास चावू नयेत याची काळजी प्रत्येक पालक घेत असतात. कारण डेंग्यूला कारणीभूत ठरणारे एडिस इजिप्ती डास हे विशेषतः सकाळी आणि सूर्यास्तापूर्वी सर्वात जास्त सक्रिय असतात. त्यामुळे मुलांना यावेळेस डासं चावण्याची शक्यता असते. तर आपण अनेकदा बाजारात मिळणारे अनेक प्रकारचे कॉइल, इलेक्ट्रिक रिफिल मशीन आणि स्प्रे उपलब्ध आहेत, परंतु हे केमिकल्स असलेले प्रोडक्ट घरात सतत लावून ठेवणेही लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यासाठी मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने तुमच्या मुलांना डासांपासून वाचवायचे असेल तर हे काही नैसर्गिक गोष्टी खूप उपयुक्त ठरू शकतात.
नैसर्गिक घटक घरी सहज उपलब्ध असतात आणि स्वस्त असतात, आणि त्यात कोणतेही केमिकल नसल्यामुळे आरोग्याला नुकसान पोहोचण्याची शक्यता कमी असते. चला तर मग आजच्या लेखात आपण हे काही घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊयात ज्यामुळे मुलांच्या आजूबाजुला डास फिरकणारही नाही.
कापूर आहे खूपच प्रभावी
डासांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या घरात कापूर जाळू शकता. यामध्ये थोडेसे हवन साहित्य मिक्स आणि ते पेटवा. यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईलच, शिवाय याचा धूर डास आणि कीटकांनाही घरातून दूर करेल. तर कापूराचा दुसरा उपाय म्हणजे कापूराची पूड करा आणि त्यात नारळाचे तेल मिक्स करून मुलांच्या त्वचेवर लावा. अशाने मुलांच्या आसपासही डास फिरणार नाही आणि त्यापासून त्यांचे संरक्षण होईल. मात्र ही एक गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय करताना प्रथम मुलांच्या त्वचेला लावण्यापुर्वी पॅच टेस्ट करा.
कडुलिंबाचे तेल
नैसर्गिक तेल सुद्धा डास दूर करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. तुम्ही तुमच्या मुलांच्या आणि तुमच्या स्वतःच्या त्वचेला कडुलिंबाचे तेल लावू शकता. हे डासांना देखील दूर करते. कडुलिंबामध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने ते तुमच्या त्वचेचे संक्रमणापासून संरक्षण करते. कडुलिंबाची पाने आणि झाडाच्या सालीची पेस्ट करून तुम्ही पुरळ, मुरूमांवर लावल्याने ही समस्याही दूर होण्यास मदत होऊ शकते.
लिंबू आणि निलगिरी
डासांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही लिंबाच्या रसामध्ये निलगिरी तेल मिक्स करून ते मुलांच्या त्वचेवर लावू शकता. हे मिश्रण त्वचेवर लावता येते.
सिट्रोनेला तेल
सिट्रोनेला तेल डासांपासून बचाव करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. सिट्रोनेला तेल गवतापासून काढले जाते. तसेच या तेलाचा वापर अरोमाथेरपीमध्ये देखील केला जातो. कारण लिंबाप्रमाणे त्याचा ताजा सुंगध मनाला आराम देतो आणि मूड सुधारतो. तर या तेलात असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर ठरतात, म्हणून तुम्ही सिट्रोनेला तेल डासांपासून संरक्षण करण्यासाठी त्वचेवर लावू शकता.
या गोष्टी लक्षात ठेवा
नैसर्गिकरित्या डासांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, या पद्धतींचा अवलंब करा आणि घरातील प्रत्येकाने, विशेषतः मुलांना पूर्ण बाह्यांचे कपडे घालवे याची खात्री करा. झुडुपे असलेल्या झाडांजवळ जाणे टाळा. घरात डास असतील तर मुलं झोपतात त्याठिकाणी मच्छरदाणी लावा. हा डासांपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तुम्ही कापूर, पुदिन्याची पाने आणि लसूण यांसारखे काही घरगुती घटक यांचा वापर करून डासांपासून बचाव करण्यासाठी डास प्रतिबंधक स्प्रे देखील बनवू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)