भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि निर्णायक टी20 सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात फक्त 4.5 षटकांचा खेळ झाला आणि भारताने बिनबाद 52 धावा केल्या होत्या. पण विजांचा कडकडात आणि पावसाने हजेरी लावल्याने सामना रद्द करावा लागला. भारताने ही मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली आहे. ऑस्ट्रेलियाची 2022 पासून टी20 द्विपक्षीय मालिकेत वाईट स्थिती आहे. 2022 मध्ये टीम इंडियाने 2-1 ने पराभव केला होता. त्यानंतर इंग्लंडने 2-0 पराभवाची धूळ चारली. 2023 मध्ये भारताने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला 4-1 ने मात दिली होती. मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने या मालिकेचं विश्लेषण केलं. तसेच टीम इंडियाचं मालिका विजयाबाबत अभिनंदन केलं. त्याचबरोबर टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या नेतृत्वाबाबतही आपलं स्पष्ट मत ठेवलं. मिचेल मार्शने या मालिकेतून खूप काही शिकल्याचं सांगितलं आहे. तसेच या गोष्टी भविष्यात नक्कीच कामी येतील असं स्पष्ट केलं.
मालिका पराभवानंतर मिचेल मार्शने सांगितलं की, ‘मला आठवत नाही की कधी आम्ही विना पावसाचं शेवटचा सामना खेळलो होतो. पण ही मालिका चांगली राहिली. भारताने त्यावेळेस सामने जिंकले जेव्हा त्याची खरंच गरज होती. टीम इंडियाला या विजयासाठी शुभेच्छा. या मालिकेत आम्ही टीम म्हणून बरंच काही शिकलो. जे पुढे जाऊन आमच्या कामी येईल. ज्या खेळाडूंना संधी दिली गेली, त्यांनी चांगली कामगिरी केली. तसेच आपली भूमिका योग्य पद्धतीने बजावली.आपण त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा करू शकतो.’
मिचेल मार्शने पुन्हा एकदा वरिष्ठ खेळाडूंचा उल्लेख करत सांगितलं की, ‘जेव्हा आमचे सर्व प्रमुख खेळाडू खेळत असतात, तेव्हा आमचा संघ बराच स्थिर दिसतो. बिग बॅश सुरू होणार आहे, ज्याचा खेळाडूंना आनंद होईल. आशा आहे की, पर्थ स्कॉर्चर्स जेतेपद जिंकण्यात यशस्वी होतील. मला वाटते की पॅट कमिन्स नव्हे तर मी टी20 विश्वचषकात संघाचे नेतृत्व करेन.’ टी20 वर्ल्डकप स्पर्धा पुढच्या वर्षी भारतात होणार आहे. भारत आणि श्रीलंकेकडे स्पर्धेचं यजमानपद आहे. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होतील.