वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेत भारतीय संघाचा प्रवास कठीण होता. एक एक कठीण टप्पा पार करत भारताने हे यश संपादन केलं. खरं तर साखळी फेरीतील भारताची स्थिती पाहून उपांत्य फेरी गाठेल की नाही अशी शंका होती. पण भारताचं गणित सुटलं आणि बाद फेरीत स्थान मिळालं. भारताने या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंकेविरूद्ध खेळला आणि विजयाने सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला लोळवलं. पण त्यानंतर भारताची विजयाची गाडी रूळावरून घसरली. दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. सलग तीन पराभवानंतर बाद फेरीचं गणित चुकलं होतं. पण न्यूजीलंडला पराभूत करत भारताने उपांत्य फेरीत जागा पक्की केली. तर साखळी फेरीतील बांगलादेशविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि भारताला 1 गुण मिळाला. पण शेवटच्या साखळी फेरीच्या सामन्यात भारताला मोठा धक्का बसला. कारण फॉर्मात असलेली प्रतिका रावल या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाली होती. त्यामुळे तिला बाद फेरीच्या सामन्यांना मुकावं लागलं. उर्वरित दोन सामन्यांसाठी भारतीय संघात शफाली वर्माची एन्ट्री झाली.
भारताचा उपांत्य फेरीतील सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी झाला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 338 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं होतं. त्यामुळे अनेकांनी आशा सोडल्या होत्या. पण जेमिमा रॉड्रिग्स आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या खेळीमुळे हा विजय शक्य झाला. भारताने हा सामना 5 विकेट आणि 9 चेंडू राखून जिंकला. अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेशी लढत झाली. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजी करावी लागली. या सामन्यात प्रतिकाच्या बदल्यात संघात स्थान मिळवलेल्या शफाली वर्माची जादू चालली. सुरुवातीला फलंदाजी आणि गोलंदाजीत तिने जादू केली. भारताने 50 षटकात 7 गडी गमवून 298 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण दक्षिण अफ्रिकेचा संघ सर्व गडी गमवून 246 धावा करून शकला. हा सामना भारताने 52 धावांनी जिंकला आणि पहिल्यांदाच आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेवर नाव कोरलं. भारताने आयसीसी वुमन्स वनडे वर्ल्डकप ट्रॉफी उंचावली तेव्हा आनंदाचे आणि अभिमानाचे अश्रू होते. पण क्रीडाप्रेमींच्या मनात एक खंत होती. ती म्हणजे व्हीलचेअरवर असलेल्या प्रतिकाला विजयी मेडल का मिळालं नाही?
प्रतिका रावलला का मेडल दिलं नाही?आयसीसी नियमानुसार, दुखापतीमुळे किंवा इतर कारणास्तव एखाद्या खेळाडूला स्पर्धेदरम्यान बदलले तरत्याला संघाचा सक्रिय सदस्य मानलं जात नाही. त्याच्या ऐवजी बदली खेळाडू अधिकृतपणे 15 सदस्यांच्या खेळणाऱ्या संघाचा भाग होतो. तर जखमी खेळाडूला स्पर्धेतून बाहेर मानले जाते. असंच प्रतिकाच्या बाबतीत झालं. प्रतिका रावल बाहेर गेली आणि शफाली वर्माला संघाचा भाग मानलं गेलं. स्पर्धेच्या शेवटी संघाच्या अधिकृत अंतिम 15 सदस्यीय संघात असलेल्या खेळाडूंनाच पदके दिली जातात. यात बाद फेरी आणि अंतिम फेरीचा समावेश आहे. प्रतिका रावल उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यांना खेळू शकली नाही, म्हणूनच तिला विजेत्याचे पदक देण्यात आले नव्हते.
संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या प्रतिका रावलला पदक न मिळाल्याने क्रीडारसिकांनी नाराजी व्यक्त केली होती. स्पर्धेदरम्यान दुखापत झालेल्या खेळाडूला पदक मिळण्यापासून का वंचित ठेवले? असा सावलही अनेकांनी विचारला होता. प्रतिका रावलने संघाला अंतिम टप्प्यात पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे या नियमात बदल करण्याच्या मागणीने जोर धरला. स्पर्धेदरम्यान किमान एका सामन्यात भाग घेतलेला कोणताही खेळाडू नंतर दुखापतीमुळे बाहेर गेला तरी त्याला विजेत्याच्या पदक मिळायला हवं असं अनेकांनी सूचवलं. 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत जेसन गिलेस्पीच्या बाबतीत असंच घडलं होतं. त्याला जेतेपदाचं पदक मिळाल नव्हतं. पण प्रतिका याबाबतीत लकी ठरली. कारण आयसीसीने याबाबतची दखल घेतली आणि तिला पदक मिळवून दिलं.
प्रतिका रावलच्या गळ्यात मेडलप्रतिका रावल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटली तेव्हा तिच्या गळ्यात मेडल होतं. त्यामुळे तिला मेडल कसं मिळालं? याबाबत चर्चांना उधाण आलं. प्रतिका रावलने याबाबतचा खुलासा स्वत: केला. तिने सांगितलं की, ‘माझ्याकडे माझं स्वत:चं मेडल आहे. मला टीम मॅनेजरचा कॉल आला होता. त्यांनी सांगितल की जय शाह यांनी माझं मेडल मिळवून दिलं आहे. आता माझ्याकडे स्वत:चं मेडल आहे. जेव्हा मी मेडलचं बॉक्स खोललं तेव्हा मी खूप भावुक झाली. कारण खूप साऱ्या भावना माझ्या मनात होत्या. त्या मी सांगू शकत नाही.’
वुमन्स वर्ल्डकप 2025 स्पर्धेतील प्रतिकाची कामगिरीवुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत प्रतिकाने चांगली कामगिरी केली. तिने साखळी फेरीतील सर्व सामने खेळले. पण शेवटच्या सामन्यात सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकली नाही. न्यूझीलंडविरुद्ध तिची 122 धावांची खेळी सर्वात्तम ठरली. या खेळीमुळे भारताला उपांत्य फेरीत स्थान मिळालं होतं. प्रतिकाने सहा सामन्यात 50हून अधिकच्या सरासरीने 308 धावा केल्या. तसेच दोन विकेटही घेतल्या आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर राहिली.