गाथेच्या शोधात – स्मृती जतनाची भावना
Marathi November 09, 2025 08:25 AM

>> विशाल फुटाणे

ज्ञान व अक्षर हे नाशाच्या पलीकडे टिकतात, असा उदात्त विचार करीत दक्षिण भारतातील चोल राजवंशाने प्रत्येक बांधकाम, प्रत्येक दान आणि प्रत्येक निर्णय याची शिलालेखांतून नोंद केली. आज त्या शिलालेखांमुळेच आपल्याला त्यांच्या प्रशासनाची, अर्थनीतीची आणि समाजरचनेची सविस्तर कल्पना मिळते.

शिलालेखांचे महत्त्व आणि त्यांचे जतन यासंदर्भात जगाच्या इतिहासात सर्वात दक्ष असे कोणते राजघराणे असेल तर ते म्हणजे दक्षिण भारतातील चोल राजवंश. त्यांनी केवळ मंदिरे उभारली नाहीत, तर त्या मंदिरांच्या भिंतींवर इतिहास, संस्कृती आणि कर्तव्य यांचे अक्षरश कोरीव चित्र उभे केले. वैद्यनाथेश्वर मंदिरात सापडलेल्या एका शिलालेखात चोल राजाने स्पष्ट आदेश दिला, ‘जेव्हा या मंदिराचे जीर्णोद्धार करायचे असेल तेव्हा भिंती पाडण्यापूर्वी त्यावरील सर्व शिलालेख नव्या भिंतींवर पुन्हा कोरले पाहिजेत.’ अशा अद्भुत विचाराने ते काळाच्या पुढे होते. किती विलक्षण विचार आहे हा! माहिती म्हणजे केवळ आकडे वा आदेश नाहीत, ती म्हणजे कार्याचा आत्मा. म्हणून ती कायमची जतन राहिली पाहिजे ही भावना.

चोल राजे केवळ धर्माभिमानी नव्हते, ते इतिहासाभिमानीही होते. त्यांनी आपल्या उत्तराधिकाऱयांना आदेश दिले की, मंदिराच्या जीर्णोद्धारासंबंधी दान, लष्करी मोहिमा आणि केलेल्या कार्यांची सविस्तर नोंद शिलालेखाच्या रूपात जतन केली जावी. या आदेशाची अंमलबजावणी त्यांनी स्वत केली. शिवपुरीश्वर मंदिरातील विनायक पिल्लयार मंदिराच्या भिंती दुरुस्त केल्यानंतर तेथील शिलालेख पुन्हा नव्याने कोरले गेले, अशी नोंद सापडते. चोल राजांना पुरातन वस्तूंचे संवर्धन आणि संरक्षण किती महत्त्वाचे आहे याची खोल जाणीव होती. त्यांनी आपल्या मंदिरांतील दगडी शिलालेख, ताम्रपटांवरील आदेश, तसेच प्रशासकीय नोंदी या सर्वांचा उपयोग केवळ शासनासाठी नव्हे, तर पुढील पिढय़ांसाठी ज्ञानाचे भांडार म्हणून केला. हा आदेश प्रशासनिकदृष्टय़ा एक आश्चर्य आहे. कारण यात फक्त वास्तू जतनाची नव्हे, तर माहिती आणि स्मृती जतनाची भावना आहे. शिलालेख हे चोलांसाठी दगडावर कोरलेले धर्मग्रंथ होते. शासनाचे, समाजाचे आणि संस्कृतीचे साक्षी.

तेव्हाच्या राजांना हे ठाऊक होते की काळ नाश करतो, पण ज्ञान व अक्षर हे नाशाच्या पलीकडे टिकतात. म्हणूनच त्यांनी प्रत्येक बांधकाम, प्रत्येक दान आणि प्रत्येक निर्णय याची शिलालेखांतून नोंद केली. आज त्या शिलालेखांमुळेच आपल्याला त्यांच्या प्रशासनाची, अर्थनीतीची, आणि समाजरचनेची सविस्तर कल्पना मिळते.

इतिहासात असेही प्रसंग आले की, शत्रू राज्याने जिंकलेल्या प्रदेशातील विजयशिलालेखदेखील नष्ट केले नाहीत. जसे चालुक्यांचा पराभव कांचीपुरमच्या पल्लवांनी केला आणि बदामी किल्ल्यावर ‘जयशासन’ हे शब्द कोरले. पुढे बदामीच्या चालुक्यानी कांचीपुरम जिंकून घेतले आणि पल्लवांचा पराभव केला तिथे विजयस्तंभ उभारला. पल्लवांच्या पराभवानंतर बदामी येथे ‘जयशासन’ म्हणून कोरलेला शिलालेख तसाच ठेवला. कारण भारतीय मनोवृत्तीला त्या कोरीव अक्षरात ‘शब्दरूप सत्य’ दिसत होते. विरोधकाचा असला तरी तो प्रकृतीचा आवाज होता आणि नंतरच्या काळात जेव्हा ‘गद्धेगळ’ (अर्थहीन शब्द, अवनतीचे रूप) समाजात वाढू लागले, तेव्हा अक्षराचे, शिलालेखाचे आणि सत्याचे महत्त्व कमी होऊ लागले. हाच भारतीय समाजाचा सांस्कृतिक उतार होता. त्यांना ठाऊक होतं की, प्रशासनाचा इतिहास म्हणजेच राष्ट्राचा इतिहास. हे लक्षात घ्यायला हवे की, ज्या समाजात माहिती हरवते, तिथे जबाबदारीही हरवते.

चोलांनी हजारो वर्षांपूर्वी जो विचार रुजवला की, ‘माहिती म्हणजे स्मृती, आणि स्मृती म्हणजे संस्कृती.’ हा विचार आजच्या प्रत्येक प्रशासकाने अंगी बाळगायला हवी. ही जाणीव आजच्या काळातही तेवढीच आवश्यक आहे. कारण एखाद्या राष्ट्राचा विकास केवळ नव्या इमारतींवर नाही, तर जुन्या स्मृती जपण्याच्या क्षमतेवर ठरतो.आपण मात्र शतकांपूर्वीची मंदिरे, शिलालेख आणि दस्तऐवज नष्ट होऊ देतो, हे आपल्या सांस्कृतिक उत्तरदायित्वावर प्रश्नचिन्ह आहे. चोलांची शिकवण आपल्याला सांगते, ‘पुरातन वस्तू म्हणजे भूतकाळ नव्हे, ती म्हणजे भविष्यासाठी ठेवलेला अनुभवाचा ठेवा.’ दगडावर कोरलेले अक्षर, देवळात जपलेली मूर्ती किंवा ताम्रपटावर उमटलेली राजमुद्रा या सर्वात आपली ओळख दडलेली आहे आणि ती ओळख जिवंत ठेवणारे पहिले खरे वारसदार म्हणजे चोल राजघराणे.

या उदाहरणावरून आपण सहज ओळखू शकतो की, दक्षिण भारतातील लोक किती सुसंस्कृत आणि संस्कृती-जाणते होते. त्यांच्या दृष्टीने दगडावर कोरलेले अक्षर हे केवळ लेखन नव्हते ते प्रकृतीचे जिवंत स्वरूप होते. महाकवी कालिदासाने ‘रघुवंशम्’मध्ये म्हटले आहे, ‘वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये, जगत पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ।’ याचा अर्थ असा की, वाक (शब्द) आणि अर्थ हे एकरूप आहेत. त्यांना विभक्त करता येत नाही. हीच भावना भारतीय शिलालेखांमध्ये जिवंत आहे. ते ज्ञानाचे माध्यम आहेत, सत्याचे साक्षीदार. म्हणूनच त्यावरील अक्षर मिटवणे म्हणजे स्वतच्या स्मृतीवर पुसट ओढणे होय. दगडावर कोरलेली अक्षरे केवळ इतिहास सांगत नाहीत, ते आपल्या संस्कृतीची आत्मकथा सांगतात. दगडावर कोरलेले अक्षर म्हणजे साक्षात प्रकृतीचे रूप असते.
(लेखक इतिहास व पुरातत्त्व संशोधक आहेत.)
[email protected]

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.