Bangladesh News : बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भारताच्या आश्रयाला आहेत. त्यांचे ठिकाणही गुप्त आहे. गेल्यावर्षी त्यांचे सरकार उलथवण्यात आले होते. अमेरिकेने हा डाव साधल्याचा आरोप नेहमी होतो. त्यानंतर भारतविरोधी मोहम्मद युनूस यांचे काळजीवाहू सरकार देशाचा गाडा हाकत आहे. पण युनूस सत्तेत आल्यापासून कट्टरतावाद्यांनी हैदोस घातला आहे. हा देश तालिबार राजवटीकडे हळूहळू जात असल्याचे म्हटले जाते. पाणी डोक्यावरून जात असल्याने शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षाने युनूस यांच्याविरोधात दंड थोपाटले आहेत.
अवामी पक्षाने पुन्हा फिनिक्स भरारी घेतल्याचे म्हटले जाते. गोंधळलेल्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी ढाका बंदची हाक देण्यात आली आहे. ढाका लॉकडॉऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बांगलादेशाला प्रतिगामी करण्याचे प्रयत्न उधळून लावण्याचा निर्धार अवामी लीगने घेतला आहे. परिणामी घाबरलेल्या युनूस सरकारने ढाक्याला लष्करी छावणीचे रुप दिले आहे. ढाक्यातील चौकाचौकात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर युनूस यांच्या घरासमोर तर मोठा फौजफाटा लावण्यात आला आहे.
तगडा पोलिस बंदोबस्त
अवामी लीगने 13 नोव्हेंबर रोजी ढाका लॉकडाऊन जाहीर केले आहे. विविध बंगाली वृत्तपत्रांनी ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या (DMP) आधारे दिलेल्या वृत्तानुसार जवळपास 7,000 पोलिस शहरात तैनात करण्यात आले आहे. तर शहरातील 142 महत्वपूर्ण ठिकाणी अजून फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यामध्ये काळजीवाहू सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या घराचाही समावेश आहे. या मोर्चात मोठा हिंसाचार होण्याची भीती व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने देशाची अर्थव्यवस्था, समाजव्यवस्थ आणि राजकारण चुकीच्या दिशेने भरकटवले. तर आता युनूस थेट पाकसारख्या दुश्मनाच्या मांडीवर जाऊन बसल्याचा आरोप अवामीने केला आहे. यासह इतर अनेक मागण्यांसाठी हे लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
वाहनांची कसून तपासणी
पोलिसांचे दंगाकाबू पथक, चिलखतबंद वाहनं, बॅरिकेट्स, स्टीलची हेल्मेट तसेच आपत्कालीन स्थितीत अग्निशमन दल, रुग्णालय यांना अलर्ट देण्यात आला आहे. पोलिसांची अतिरिक्त कुमकही मागवण्यात आली आहे. तर ढाका लगतची गावं आणि शहरातही रेड अलर्ट देण्यात आल्याचे समजते. यामुळे अवामी लीगच्या या लाँग मार्चमध्ये मोठ्या संख्येने नागरीक रस्त्यावर उतरण्याची भीती युनूस सरकारला वाटत आहे. तर आतापासूनच ढाक्याकडे येणाऱ्या वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी पोलिसांची छापेमारी सुरू आहे. पण अवामी लीग मागे हटणार नसल्याचे नेते आणि कार्यकर्ते सांगत आहेत. गेल्या एका वर्षात सत्ता परिवर्तनानंतर बांगलादेश हे अनेक देशांचे कठपुतली झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या काळात देशाची मोठी पिछेहाट झाल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.