सुपरस्टार धर्मेंद्र यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केलेलं असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे दिग्गज अभिनेते प्रेम चोपडा यांना देखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रेम चोपडा यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबत प्रेम चोपडा यांचे जावई विकास भल्ला यांनी अभिनेता प्रेम चोपडा यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे, प्रेम चोपडा यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रेम चोपडा यांची प्रकृती स्थिर आहे, काही काळजी करण्याचं कारण नाही, त्यांना काही दिवसांमध्ये रुग्णालयातून सुट्टी मिळेल, असं विकास भल्ला यांनी इंडिया टुडे सोबत बोलताना म्हटलं आहे. वयामुळे तब्येतीत बिघाड झाला आहे, हे एक नॉर्मल रुटीन आहे, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही, असं देखील विकास भल्ला यांनी म्हटलं आहे.
350 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम
प्रेम चोपडा यांचा 23 सप्टेंबरला वाढदिवस असतो, ते 23 सप्टेंबरला 90 वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की वयोमानामुळे येणाऱ्या या समस्या आहेत, त्यांना नियमित चेकअपसाठी रुग्णालयात आणलं होतं. मात्र त्यानंतर त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रेम चोपडा यांनी ‘उपकार’, ‘बॉबी’, ‘दो अनजाने’, ‘क्रांती’ यासारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका केली आहे. प्रेम चोपडा यांनी तब्बल 60 वर्ष बॉलिवूडमध्ये काम केलं. त्यांनी तब्बल 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2023 मध्ये त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
राजेश खन्ना यांच्यासोबत वीस पेक्षा जास्त चित्रपट
प्रेम चोपडा यांचा जन्म पाकिस्तानमधील लाहोरमध्ये झाला, त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात पत्रकारितेनं केली, त्यानंतर त्यांनी काही पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका केली. त्यानंतर त्यांनी बॉलिवूड चित्रपटामध्ये पदार्पण केलं. त्यांना पहिली मोठी भूमिका शहीद चित्रपटामध्ये मिळाली, त्यानंतर ‘उपकार’, ‘बॉबी’ सारखे त्यांची भूमिका असलेले चित्रपट हीट ठरले. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाचीच भूमिका केली. खलनायकाच्या भूमिकेमधून त्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली. ‘प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपड़ा’ हा त्यांचा डायलॉग खूपच प्रसिद्ध आहे. त्यांनी राजेश खन्नासोबत वीस पेक्षा अधिक चित्रपट केले आहेत, दरम्यान त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.