आळेफाटा, ता. १२ : श्री काळभैरवनाथ जयंतीनिमित्त आवटेवाडी (राजुरी, ता. जुन्नर) येथे महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित आरोग्य शिबिराचा ३५० जणांनी लाभ घेतला.
श्री खंडेराय भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचा शुभारंभ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी यांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी राजुरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल बांगर, रूपाली नायकवडी, जालिंदर कांडाळे, प्रमिला औटी, योगिता औटी व देवस्थान मंडळाचे खजिनदार अशोक औटी, उपाध्यक्ष जी. के. औटी, किरण औटी तसेच आरोग्य सेविका, आशा वर्कर उपस्थित होते. आरोग्य तपासणीसह ज्या नागरिकांकडे अद्याप आयुष्मान भारत कार्ड, वयवंदना कार्ड नव्हते, त्यांचे ऑनलाइन नोंदणी व कार्ड जारी करण्यात आले.