04341
नरेंद्र डोंगरावर उलगडलं पक्षीवैभव
‘वाईल्ड कोकण’ ः ४६ प्रजातींची नोंद, पक्षी सप्ताहनिमित्त निरीक्षण
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः वाईल्ड कोकण सावंतवाडी संस्थेच्या वतीने ५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान साजऱ्या केलेल्या पक्षी सप्ताहानिमित्त नरेंद्र डोंगर येथे पक्षीनिरीक्षणाचे आयोजन करण्यात आले. यात तब्बल ४६ पक्षीप्रजातींची नोंद झाली.
या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्रा. धीरेंद्र होळकर, उपाध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर, सचिव प्रा. डॉ. गणेश मर्गज, मार्गदर्शक व सावंतवाडीचे माजी डीएफओ सुभाष पुराणिक, बांदा येथील पक्षीनिरीक्षक प्रवीण सातोसकर, जिल्हा परिषदेचे माजी कर्मचारी सौ. व श्री. जगदीश सावंत, संजय सावंत, ज्ञानेश नाईक, रुहान शेख, रुपेश तेंडोलकर, चैताली पाटकर, आर्या गायकवाड, ऐश्वर्या गायकवाड, विना सावंत, कृपा परब, मनाली पार्सेकर आणि ओमकार परब आदींनी सहभाग घेतला.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ पक्षीनिरीक्षक मारुती चितमपल्ली (जन्म : ५ नोव्हेंबर) आणि सुप्रसिद्ध पक्षीतज्ञ पद्मश्री डॉ. सलीम अली (जन्म : १२ नोव्हेंबर) यांच्या जयंतींच्या औचित्याने राज्यभर ५ ते १२ नोव्हेंबर हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र पक्षमित्र संघटनेच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी पक्षीनिरीक्षण कार्यक्रम घेतले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून सावंतवाडीत हा उपक्रम राबविण्यात आला. सकाळी ७ ते ९ या दोन तासांच्या निरीक्षणात दिसलेल्या ४६ प्रजातींमुळे नरेंद्र डोंगर परिसरातील समृद्ध पक्षीविविधतेचे दर्शन घडले. सचिव डॉ. गणेश मर्गज यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुभाष गोवेकर यांनी आभार मानले.
-----------------
विशेष नोंद झालेले पक्षी
पक्षीनिरीक्षणादरम्यान फ्लेम-थ्रोटेड बुलबुल, फॉर्कटेल ड्रोंगो कुकू, चेस्टनट-हेडेड बी-ईटर, हार्ट-स्पॉटेड वूडपेकर, व्हाईट-चीक्ड बार्बेट, ब्लू रॉक थ्रश, व्हर्डिटर फ्लायकॅचर, गोल्डन-फ्रंटेड लीफबर्ड, स्वर्गीय नर्तक (पॅराडाईज फ्लायकॅचर), शिकरा, ग्रीनीश बॅबलर, वेस्टर्न क्राऊन्ड वॉर्ब्लर यांसह अनेक महत्त्वाच्या प्रजाती दिसल्या. काही प्रदेशनिष्ठ प्रजातीही या वेळी आढळल्या.