Mumbai-Ahmedabad Highway: मुंबई-अहमदाबाद मार्गाची नवी आशा! द्रुतगती महामार्गाच्या कामाने गती, वाहतूक कधी सुरू होणार?
esakal November 15, 2025 07:45 AM

मनोर : मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या कामाने गती घेतली आहे. पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील महामार्गाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. तलासरी ते डहाणू तालुक्याच्या हद्दीतील टप्प्यात भराव आणि काँक्रीटीकरणाचे काम ९५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. पालघर जिल्ह्यातील महामार्गाची कामे येत्या एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण करून वाहतूक सुरू होण्याची शक्यता असल्याने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

पालघरजिल्ह्याच्या हद्दीतील नद्यांवरील बहुतांश पुलांची बांधकामे पूर्ण करण्यात आली असून, सद्य:स्थितीत पालघर तालुक्यातील सोनावे आणि दहिवाले गावांदरम्यान वैतरणा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या कामाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्ग दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोरचा भाग आहे. या महामार्गाची लांबी ३८० किलोमीटर असून, पालघर जिल्ह्यात १२० किलोमीटर लांबीचा भाग महत्त्वाचा आहे. महामार्गामुळे डोंगराळ भाग, नद्या, वन क्षेत्राचा मोठा भाग बाधित झाला. भूसंपादन प्रक्रिया, पर्यावरणीय मंजुरी, स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या आणि वन विभागाच्या जमिनी अशा अडचणी निर्माण झाल्या होत्या.

Mumbai Police: पोलिसांचा अॅक्शन मोड! बेकायदा पार्किंगविरोधात विशेष मोहीम कृषी उत्पादनांची वाहतूक सुलभ

मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गामुळे मुंबई-बडोदा दरम्यानच्या प्रवासातील वेळेत घट होणार आह. उरणस्थित जेएनपीटी बंदर, कोकण, गोवा आणि पुण्याच्या दिशेने जाणारी अवजड वाहनांच्या संख्येत घट होणार आहे. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याची शक्यता आहे. या महामार्गामुळे जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन आणि कृषी उत्पादनांची वाहतूक सुलभ होणार आहे.

पालघर जिल्ह्यातील एका टप्प्याचे काम ९५ टक्क्यापर्यंत तर उर्वरित दोन टप्प्यांची प्रगती ८५ टक्के झाली आहे. येत्या एप्रिल महिन्यापर्यंत तिन्ही टप्प्यांतील कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

- सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, ठाणे

जुन्या रेल्वे इंजिन आणि डब्यांचे काय होते?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.