शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज,अखेर प्रतीक्षा संपली, या दिवशी पीएम किसानचे 2000 रुपये खात्यात येणार
Marathi November 15, 2025 09:25 PM

पीएम किसन नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना कधी मिळणार याबाद्दल नवी माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 21 व्या हप्त्याचे 2000 रुपये 19 नोव्हेंबरला मिळणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात एका वर्षात तीन समान हप्त्यांमध्ये 6000 रुपये पाठवण्यात येणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेच्या 20 हप्त्यांची  रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती. केंद्र सरकारनं 24 फेब्रुवारी 2019 ला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता जारी केला होता. तेव्हापासून आतापर्यंत 20 हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात 2 ऑगस्ट रोजी पाठवण्यात आली होती.

PM Kisan 21 Installment : 18000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार 19 नोव्हेंबरला योजनेच्या 21 व्या हप्त्याची रक्कम पाठवली जाणार आहे. त्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात 18000 कोटी रुपये पाठवण्यात येणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याची रक्कम पूरग्रस्त राज्यांना अगोदरच देण्यात आली आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरच्या शेतकऱ्यांना पूरस्थितीतून सावरण्यासाठी पीएम किसानच्या हप्त्याची 21 व्या रक्कम देण्यात आली आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेतून आतापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांना 3.70 लाख कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. ही योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत 20 हप्त्यांचे एकूण 40000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळाले आहेत. पीएम किसान योजनेचे दोन हप्ते जारी करण्यामध्ये किमान चार महिन्यांचा कालावधी ठेवला जातो. त्यानुसार 2 ऑगस्ट 2025 ला पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली होती. तेव्हा 20500 कोटी रुपये 9.7 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पाठवण्यात आले होते.

ई केवायसी करणं आवश्यक

शेतकऱ्यांना 21 व्या हप्त्याची रक्कम मिळवायची असेल तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. जे शेतकरी ई केवायसी करणार नाहीत त्यांना 2000 रुपये मिळणार नाहीत.  ई केवायसी सीएससी सेंटर वर जाऊन करता येईल. किंवा पीएम किसानच्या वेबसाईटला भेट देऊन देखील करता येईल. ओटीपी आधारित ई केवायसी आणि बायोमेट्रिक ई केवायसी, फेस आधारित ई केवायसी असे पर्याय उपलब्ध आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.