टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळे निर्धारित वेळेच्या काही मिनिटांआधी संपवण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात भारताच्या 30 धावांच्या प्रत्युत्तरात खेळ संपेपर्यंत 35 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 93 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरुद्ध अशाप्रकारे एकूण 63 धावांची आघाडी मिळवली आहे. त्यामुळे सामन्याचा निकाल तिसऱ्याच दिवशी लागणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. भारताने या सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे तिसऱ्या दिवशी अर्थात रविवारी 16 नोव्हेंबरला विजय मिळवत मालिकेत आघाडी घेण्याची सुवर्णसंधी आहे.
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या दिवशी 159 रन्सवर ऑलआऊट केलं. दक्षिण आफ्रिकेला गुंडाळण्यात जसप्रीत बुमराहने प्रमुख भूमिका बजावली. जसप्रीत बुमराहने 5 विकेट्स मिळवल्या. तर इतरांनी चांगली साथ दिली. दक्षिण आफ्रिकेलला झटपट गुंडाळल्याने भारताकडे मोठी आघाडी घेण्याची संधी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केलं.
भारताने 159 धावा पूर्ण करत आघाडीच्या दिशेने सुरुवात केली. मात्र दक्षिण आफ्रिकेने भारताला मोठी आघाडी मिळवून दिली नाही. दक्षिण आफ्रिकेने भारताला 189 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताला अशाप्रकारे फक्त 30 धावांचीच आघाडी मिळवता आली. टीम इंडियासाठी पहिल्या डावात केएल राहुल याने सर्वाधिक 39 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना आश्वासक सुरुवात मिळाली. मात्र त्यापैकी एकालाही 30 पार पोहचता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी सायमन हार्मर याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. तर मार्को यान्सेन याने 3 भारतीय फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
त्यानंतर दक्षिण आफ्रिका दुसर्या डावात 30 धावांची आघाडी मोडीत काढण्यासाठी मैदानात उतरली. मात्र भारतीय गोलंदाजांनी पाहुण्या संघाला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला कमबॅक करण्याची संधीच मिळाली नाही. मात्र कॅप्टन टेम्बा बावुमा याने खिंड लढवली आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद राहिला. टेम्बाने नाबाद 29 धावा केल्या. तर मार्को यान्सेन याने 13 धावांचं योगदान दिलं. तर रायन रिकेल्टन आणि वियान मुल्डर या दोघांनी प्रत्येकी 11-11 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला भारतीय गोलंदाजांसमोर दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
भारताच्या फिरकी त्रिकुटाने या 7 विकेट्स मिळवल्या. रवींद्र जडेजा याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. कुलदीप यादव याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अक्षर पटेल याने 1 विकेट मिळवली.
दरम्यान तिसऱ्या दिवशी टीम इंडियाकडे दक्षिण आफ्रिकेला झटपट गुंडाळण्याची संधी आहे. त्यामुळे टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या दिवशी 100 धावांच्या रोखून विजय मिळवणार का? हे रविवारीच स्पष्ट होईल.