आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी (IPL 2026) एकूण 10 फ्रँचायजींनी 15 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजता रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली. कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्यासह गेली 12 वर्ष असणाऱ्या मॅचविनर ऑलराउंडर आंद्रे रसेल याला रिलीज केलं. तर चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांच्यासाठी ट्रेड झालं. राजस्थानने संजू सॅमसनच्या बदल्यात रवींद्र जडेजाला घेतलं. तर चेन्नईने संजू सॅमसन याला आपल्या संघात स्थान दिलं. तसेच इतर संघांनीही ठरल्यानुसार काही खेळाडूंना नारळ दिला. तसेच अनेक खेळाडूंवर विश्वास दाखवत त्यांना आपल्यासह कायम ठेवलं.
रिटेन्शननंतर क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या 19 व्या मोसमाचे वेध लागले आहेत. मिनी ऑक्शन कधी आणि कुठे होणार? हा गेल्या अनेक आठवड्यांपासून सातत्याने प्रश्न विचारला जात होता. मात्र अखेर या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. आयपीएलने रिटेन्शननंतर अवघ्या काही तासांनीच मिनी ऑक्शची तारीख जाहीर केली आहे. आयपीएलने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, आजपासून बरोबर 1 महिन्यानंतर 16 डिसेंबरला मिनी ऑक्शन होणार आहे. यंदाही विदेशातच मिनी ऑक्शन होणार आहे. अबुधाबीतील एतिहाद एरीनामध्ये खेळाडूंचा फैसला होणार आहे. या मिनी ऑक्शनमध्ये किती खेळाडूंचा फैसला होणार? हे जाणून घेऊयात.
एकूण 10 संघांनी रिटेन्शमधून 173 खेळाडूंना आपल्या सोबत कायम ठेवलं. यात 49 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तर मिनी ऑक्शनमधून फक्त 77 खेळाडूंनाच खरेदी करता येणार आहे. त्यासाठी एकूण 237 कोटी 55 लाख रुपये इतकी रक्कम उपलब्ध आहे. प्रत्येक संघ आपल्या गोटात जास्तीत जास्त 25 खेळाडू ठेवू शकतात.
कोणत्या संघाला किती खेळाडूंची गरज?
दरम्यान तब्बल 3 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या केकेआर अर्थात कोलकाता नाईट रायडर्स टीमकडे सर्वाधिक रक्कम आहे. केकेआरकडे सर्वाधिक 64 कोटी 30 लाख इतकी रक्कम उपलब्ध आहे. केकेआर जास्तीत जास्त 13 खेळाडू मिनी ऑक्शनद्वारे घेऊ शकते. त्यात 6 विदेशी खेळाडू घेणं बंधनकारक आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्सकडे 43 कोटी 40 लाख रुपये आहेत. सीएसके जास्तीत जास्त 9 खेळाडू आपल्या ताफ्यात घेऊ शकते.