पडघा, ता. १६ (बातमीदार) : रब्बी हंगामासाठी भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात हरभरा बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कडधान्य क्षेत्र विकास योजनेअंतर्गत पीक प्रात्यक्षिकासाठी हरभरा पिकाचे ‘फुले विक्रांत’ वाण उपलब्ध झाले आहे. हे बियाणे मे. रमेश ॲग्रो कृषी सेवा केंद्र, भिवंडी येथे मिळणार आहे. हरभऱ्याची पेरणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति शेतकरी २० किलो बियाणे देण्यात येणार आहे. या बियाण्यांवर ४५ टक्के शासकीय अनुदान मिळणार असून ५५ टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरायची आहे. २० किलो प्रति बॅग बियाण्यांची बाजारभावानुसार किंमत २३०० रुपये आहे. त्यावर ४५ टक्के म्हणजे १०४० रुपये अनुदान मिळणार असून, शेतकऱ्यांना १२६० रुपये भरून बियाण्याची बॅग मिळेल. बियाणे सुट्टे मिळणार नाहीत; फक्त २० किलोच्या बॅगमध्येच उपलब्ध असतील.
आवश्यक कागदपत्रे
* आधार कार्ड झेरॉक्स
* किमान ३५ गुंठे पेरणी क्षेत्राचा सातबारा उतारा
* शेतकऱ्यांचा संपर्क क्रमांक
* अग्रिस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक
बियाणे मिळण्याचे ठिकाण
मे. रमेश अँग्रो केम कॉर्पोरेशन (खते, बियाणे, किटकनाशके, स्प्रे पंप, शेती अवजारे यांचे दुकान) ३१८ /३,४ गोविंद निवास, नझराना कम्पाउंड, भिवंडी येथील दुकानात हरभरा पिकाचे बियाणे मिळणार आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९८६००१४०६० असा आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत या वेळेत बियाणे उपलब्ध होतील. दुपारी २ ते ३ आणि रविवारी पूर्ण दिवस दुकान बंद राहणार आहे. तालुक्यातील हरभरा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भिवंडी कृषी विभागाने केले आहे.