करार असूनही पीकविमा अपात्र
आंबा बागांच्या भरपाईचा प्रश्न ; उपाययोजनेची मागणी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १७ ः आंबा बागायतदाराकडून पाच ते दहा वर्षाच्या कराराने तरुण उद्योजक आंबाबागा फळ काढण्यासाठी घेतात. त्या बदल्यात आंबा उद्योजक रितसर करार करतात. त्या कराराच्या आधारे पीकविमा काढतात; मात्र त्याला फार्मर आयडीची अट असल्यामुळे कराराने बागा घेणाऱ्यांना पीकविमा काढता येत नसल्याचे पुढे आले आहे.
आंबा पीकविमा काढण्यासाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अनेक आंबा व्यावसायिक कराराने बागा घेतात. त्याचा पीकविमा काढण्यासाठी ते बँकांमध्ये गेले असता त्यांना फार्मर आयडीची अट असल्याचे सांगितले जाते. संबंधित उद्योजकांकडे स्वतःच्या नावावर सातबारा नसल्याने फार्मर आयडी मिळत नाही; मात्र करार हातात असतो त्यामुळे बागेचा करार असून, फार्मर आयडी नंबर नसल्याने काही उपयोग होत नाही. यापूर्वी नोटरीकडील करार बँकेत ग्राह्य मानला जात होता; मात्र मागील वर्षापासून तो नोंदणी केलेला असावा, अशी अट घालण्यात आली. असे असतानाही फार्मर आयडी नसल्यामुळे आंबा व्यावसायिकांना पीकविमा योजनेचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत. निसर्गाच्या अवकृपेमुळे आंबाबागांचे नुकसान होत आहे; मात्र आंबा पीकविमा असल्यामुळे नुकसान झाल्यास काही ना काही नुकसान भरपाई आंबा बागायत, शेतकरी यांना मिळते. आंबाबागांचे सातबारा करार हातात असूनही आंबा पीकविमा काढता येत नसल्यामुळे करारधारक आंबा व्यापारी अडचणीत असून, त्यावर काहीतरी उपाययोजना करावी, अशी मागणी आंबा व्यापारी यांनी केली आहे.