५२ वर्षांचे अरविंद, एक मध्यमवयीन ऑफिस मॅनेजर. एका साध्या दिवशी ऑफिसची जिने चढताना त्यांना अचानक छातीत दुखू लागले आणि हृदयविकाराचा झटका आला. तातडीने उपचार करून त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि ते काही दिवसांत घरी परतले. मात्र. घरी गेल्यानंतर भीतीने त्यांना जखडून टाकले. अगदी घरात चालणे, जिने चढणे किंवा पाण्याची बाटली उचलणे यासाठीही त्यांना धडधड वाढल्यासारखे वाटू लागले. त्यांना वाटत होते, की व्यायाम केला तर पुन्हा झटका येईल.
त्यांच्या हृदयतज्ज्ञांनी त्यांना ‘कार्डिॲक रिहॅबिलिटेशन’ कार्यक्रमात दाखल होण्याचा सल्ला दिला. येथे टेलिमेट्री मॉनिटरिंगखाली (म्हणजे व्यायाम करताना हृदयाचे ठोके व लय सतत यंत्राद्वारे पाहिली जात होती). त्यांनी अगदी पाच-दहा मिनिटांच्या संथ चालण्याने सुरुवात केली. पुढील काही आठवड्यांत त्यांचा व्यायाम कालावधी आणि गती वाढत गेले. नंतर त्यांनी ट्रेडमिल, इंटर्व्हल ट्रेनिंग आणि शेवटी शक्तिवर्धक व्यायाम सुरू केले. सहा महिन्यांत ते फक्त पूर्वपदावरच नाही तर त्यापेक्षा जास्त तंदुरुस्त झाले.
अरविंद यांची कहाणी एक गोष्ट स्पष्ट करते, की हृदयविकारानंतर व्यायाम योग्य पद्धतीने, टप्प्याटप्प्याने आणि वैद्यकीय नियंत्रणाखाली केल्यास तो सर्वांत शक्तिशाली औषध ठरतो.
हृदयविकारानंतरच्या व्यायामाची आवश्यकता
व्यायाम हा पुनर्वसनाचा (rehabilitation) मुख्य आधार आहे. व्यायामामुळे रक्तदाब सुधारतो, साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात येतात, हृदयाची पंपिंग क्षमता वाढते, तणाव कमी होतो, झोप सुधारते आणि पुढील हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी झालेल्या रुग्णांमध्ये व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते, स्टेंट पुन्हा ब्लॉक होण्याचा धोका कमी होतो आणि बायपास ग्राफ्टचे आयुष्य वाढते.
याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम कोरोनरी आर्टरी डिसीजची (CAD) मूळ विकृती उलटवू शकतो. व्यायामामुळे हृदयात नवीन कोलॅटरल रक्तवाहिन्या तयार होतात, हृदयाचे ‘मायोकार्डियल प्रीकंडिशनिंग’ सुधारते, दाह (inflammation) कमी होतो आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते.
व्यायाम कधी सुरू करावा?
अँजिओप्लास्टीनंतर
डिस्चार्जनंतर २४-४८ तासांत हलके चालणे सुरू करता येते.
एक आठवड्यात नियमित चालणे आणि हलका एरोबिक व्यायाम.
दोन-चार आठवड्यांत मध्यम तीव्रतेचा व्यायाम.
जोरदार व्यायाम फक्त कार्डिओलॉजिस्टची परवानगी मिळाल्यानंतर.
बायपास सर्जरीनंतर
रुग्णालयात असतानाच चालणे सुरू होते.
डिस्चार्जनंतर दोन आठवड्यांत कार्डिॲक रिहॅब.
छातीची हाडे भरून येईपर्यंत (सहा-आठ आठवडे) हाताचे व्यायाम टाळणे.
चार-सहा आठवड्यांनंतर एरोबिक व्यायाम.
आठ-बारा आठवड्यांनंतर शक्तिवर्धक व्यायाम.
एफआयटीटी तत्त्व
FITT म्हणजे Frequency, Intensity, Time आणि Type. रुग्णांना आठवड्यातील पाच-सहा दिवस, तीस-पंचेचाळीस मिनिटांचा व्यायाम करायला सांगितले जाते. यात एरोबिक व्यायाम, इंटर्व्हल ट्रेनिंग, शक्तिवर्धक व्यायाम आणि स्ट्रेचिंग यांचा समावेश असतो. तीव्रता Heart Rate, Borg Scale आणि Talk Test ने मोजली जाते.
सातत्यपूर्ण एरोबिक व्यायाम : यात चालणे, सायकलिंग, ट्रेडमिल, संथ धावणे किंवा पोहण्याचा (शस्त्रक्रियेनंतर जखम भरल्यानंतर) समावेश होतो. सुरुवातीला दहा-पंधरा मिनिटे चालणे आणि हळूहळू तीस-पंचेचाळीस मिनिटांपर्यंत वाढवणे योग्य असते. श्वासोच्छ्वास वाढतो; पण छातीत त्रास जाणवत नाही अशी गती ठेवावी.
इंटर्व्हल ट्रेनिंग : यात थोडा वेळ वेगात चालणे किंवा सायकल चालवणे आणि नंतर थोडा वेळ संथ चालणे असा क्रम असतो. हे हृदयाची क्षमता जलदगतीने वाढवते. अँजिओप्लास्टी झालेल्यांना चार-सहा आठवड्यांनंतर आणि बायपास झालेल्यांना आठ-बारा आठवड्यांनंतर हे प्रशिक्षण सुरू करता येते.
शक्तिवर्धक (Resistance) व्यायाम (1RM आणि 10RM सह) : शक्तिवर्धक व्यायामामुळे स्नायू बळकट होतात, रक्तातील साखर सुधारते आणि दीर्घकाळ हृदयावरील ताण कमी होतो. अँजिओप्लास्टीनंतर तीन-चार आठवड्यांनी आणि बायपासनंतर आठ-बारा आठवड्यांनी हे व्यायाम सुरू करता येतात. 1RM (One Repetition Maximum) म्हणजे आपण एखादे वजन एकदाच उचलू शकतो तेवढी कमाल क्षमता. 10RM म्हणजे आपण सलग दहा वेळा ज्या वजनाने व्यायाम करू शकतो ती क्षमता.
हृदयाच्या रुग्णांसाठी 10RM चाचणी जास्त सुरक्षित असते. एकदा तुमची 10RM क्षमता ठरली, की त्याच्या तीस-पन्नास टक्के वजनाने व्यायाम सुरू केला जातो. यात हलके डंबेल्स, रेसिस्टन्स बँड्स आणि खुर्ची स्क्वॉट, वॉल पुशअप्स सारखे व्यायाम येतात.
लवचिकता आणि संतुलन : स्ट्रेचिंग, योग, ध्यान आणि बॅलन्स ट्रेनिंग डिस्चार्जनंतर त्वरित सुरू करता येते. यामुळे शरीर सैल होते, श्वासोच्छवास सुधारतो आणि तणाव कमी होतो.
व्यायामाच्या तीव्रतेची मोजणी
रुग्णांच्या मनात सर्वात जास्त भीती असते, की ‘मी जास्त तर करत नाही ना?’ याचे साधे उत्तर म्हणजे योग्य मॉनिटरिंग.
हृदयगती मोजणी : कर्वोनन सूत्राने आदर्श टार्गेट हार्ट रेट काढता येतो.
HRmax = 220 – वय
HRrest = सकाळी उठल्यावरचा नाडीचा ठोका
Heart Rate Reserve (HRR) = HRmax – HRrest
Target HR = (HRR × इच्छित तीव्रता%) + HRrest
हृदयाच्या रुग्णांसाठी ४०–७०% HRR हा सुरक्षित आणि प्रभावी झोन असतो. हे स्मार्टवॉच किंवा HR मॉनिटरने सहज पाहता येते.
बोर्ग रेटिंग ऑफ पर्सिव्ह्ड एक्झर्शन (आरपीई) : बोर्ग स्केल ६ ते २० पर्यंत जाते. ११–१३ हा झोन म्हणजे हलका ते मध्यम ताण. हा झोन हृदयाच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित असतो.
टॉक टेस्ट : व्यायाम करताना तुम्ही आरामात बोलू शकत असाल; पण गाणे म्हणू शकत नसाल तर ती योग्य तीव्रता आहे. श्वास घेणे अवघड होत असल्यास गती कमी करावी.
स्मार्टवॉच आणि पल्स ऑक्सिमीटर : स्मार्टवॉच हृदयाचे ठोके, रिदम, रिकव्हरी सर्व मोजते. पल्स ऑक्सिमीटरने SpO₂ ९३ टक्क्यांपेक्षा कमी होऊ नये. अचानक SpO₂ कमी झाल्यास व्यायाम थांबवा.
टेलिमेट्री-मॉनिटर्ड व्यायाम
हृदयविकारानंतरच्या प्रारंभीच्या काही आठवड्यांत व्यायाम टेलिमेट्री मॉनिटरिंगखाली करणे अत्यंत सुरक्षित असते. टेलिमेट्रीमुळे तुमची हृदयाची लय, ठोके, इस्केमिया, बीपी बदल आणि कोणतेही अनियमित ठोके रिअल-टाइममध्ये डॉक्टरांच्या नजरेत राहतात. त्यामुळे व्यायाम करताना धोका कमी होतो आणि रुग्णांचा आत्मविश्वास वाढतो. टेलिमेट्रीने रुग्ण सुरक्षित असल्याचे सिद्ध झाल्यावर ते घरात स्वतः मॉनिटर करून व्यायाम करू शकतात.
व्यायाम केव्हा थांबवावा?
छातीत दुखणे, असामान्य श्वास लागणे, चक्कर, धडधड वाढणे, जबडा/खांद्यात पसरलेली वेदना, किंवा SpO₂ अचानक कमी होणे, हे सर्व इशारे आहेत. अशावेळी व्यायाम लगेच थांबवावा.
महत्त्वाचा संदेश
व्यायाम हे CAD साठी सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली औषध आहे. तो कोलॅटरल रक्तवाहिन्या तयार करतो. हृदयाचे मायोकार्डियल प्रीकंडिशनिंग सुधारतो. अँगिनाची लक्षणे कमी करतो आणि CAD ची मूळ विकृती उलटवू शकतो; पण व्यायाम हळूहळू, टप्प्याटप्प्याने आणि वैद्यकीय देखरेखीखाली करणे अत्यावश्यक आहे. अनियंत्रित किंवा अचानक जोरदार व्यायाम धोकादायक असू शकतो, आणि व्यायाम पूर्णपणे टाळणे हे त्याहून जास्त हानिकारक ठरते. योग्य मार्गदर्शन, नियमित मॉनिटरिंग आणि सातत्याने केलेला व्यायाम तुम्हाला पुन्हा एकदा आरोग्यपूर्ण, आत्मविश्वासपूर्ण आणि सक्रिय जीवनाकडे परत नेतो.