Teachers Suspended:'अहिल्यानगरमधील दोन परित्यक्ता शिक्षिका निलंबित';बदलीसाठी माेठा बनाव, शिक्षण क्षेत्रात खळबळ..
esakal November 18, 2025 03:45 PM

अहिल्यानगर: सोयीच्या बदलीसाठी शिक्षकांकडून विविध क्लृप्त्या केल्या जातात. कधी दिव्यांग तर कधी घटस्फोटीत असल्याचा बनाव केला जातो. जिल्हा परिषदेतील बदल्यात हे नेहमी घडते. त्याबाबत सत्यता पडताळणीसाठी नेमलेल्या समितीने दोन शिक्षिकेंवर ठपका ठेवला आहे. त्यातून त्यांना जिल्हा परिषदेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

CA Success Story:'सीए परिक्षेत आदित्य दरेकरचे सुयश'; जिद्द व चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी, आई अन् भावाचे पाठबळ..

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी संबंधित शिक्षिकांवर ही कारवाई केली. त्यात अहिल्यानगर तालुक्यातील दोन शिक्षिकांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी चंद्रशेखर पंचमुख यांनी काही शिक्षिका परित्यक्ता असल्याचे भासवीत आहेत. मुळात त्या पतीसोबत राहतात. काही शिक्षकही दिव्यांग दाखवून बदलीचा लाभ उठवीत आहेत. सोयीची बदली पदरात पाडून घेण्यासाठी त्या शासनाची फसवणूक करीत आहेत. हा इतर शिक्षकांवरील अन्याय आहे. याबाबत पंचमुख यांनी तक्रार केली होती.

या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी चौकशी समिती नेमली होती. त्यात विस्तार अधिकारी (शिक्षण), अंगणवाडी पर्यवेक्षिका, तालुका शिक्षण विभागातील लिपिक यांचा समावेश होता.

संवर्ग एकमध्ये तब्बल ५८ जणींनी सोयीच्या बदलीचा लाभ घेतला आहे. त्यावर शिक्षकांसह अनेकांना संशय होता. त्यातून तक्रारी झाल्या. सहाजणींबाबत तक्रारदारांनी आक्षेप घेतला होता. चौकशी समितीला दोघींबाबत तथ्य आढळले. त्यांच्या अहवालावरून त्यांना निलंबित करण्यात आले. इतर चौघींबाबतचा अहवाल स्वयंस्पष्ट नव्हता. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वयंस्पष्ट अहवाल देण्यास सांगितले. तो अहवाल शिक्षण विभागाकडे प्राप्त झाला आहे. त्यावरून संबंधित चार शिक्षिकांना खुलासा मागविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नगर, पारनेर, जामखेड या तालुक्यातील या संशयित शिक्षिका असल्याचे समजते.

संवर्ग एकमध्ये बदलीचा लाभ घेतलेल्या परित्यक्ता शिक्षिकांबाबत चौकशी समितीने अहवाल दिला. त्यात त्या दोषी आढळून आल्या. शासनाच्या नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. इतर चौघींबाबत स्वयंस्पष्ट अहवाल मागितला आहे. त्यात जर दोषी आढळल्या तर त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात येईल.

- आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Farmer Success Story: 'योग्य व्यवस्थापनाने ३० गुंठ्यांत घेतले ८७ टन उसाचे उत्पन्न'; बेंबळेच्या सोमनाथ हुलगे यांची कामगिरी; ऊस ५२ कांड्यांवर.. अशी केली तपासणी

तालुका स्तरावरील चौकशी समितीने संबंधित शिक्षिकेच्या घरी जाऊन तपासणी केली. त्या महिलांना न्यायालयाने मंजूर केलेला घटस्फोटाची प्रमाणित प्रत, शिक्षिकेने पतीसोबत राहत नसल्याबाबत सादर केलेले स्वयंघोषणापत्र, त्यांच्या रहिवासाचे दाखले, आधार कार्ड, शिधापत्रिका तपासली. त्यात तथ्य आढळले नाही. सादर केलेल्या प्रमाणपत्रात विसंगती असून प्रशासनाची दिशाभूल केली आहे. असे चौकशी अहवालात नमूद केल्याने दोन शिक्षकांना निलंबित केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.