कल्याण–डोंबिवलीत महायुतीतील लढत चिघळली! भाजपचा शिंदे गटावर सर्जिकल स्ट्राइक, दोन तासांत राजकीय भूकंप
esakal November 19, 2025 12:45 AM

डोंबिवली : महायुती एकत्र सत्तेत असली तरी स्थानिक पातळीवरील राजकारणात मात्र ‘मैत्री’ कुठे संपते आणि ‘स्पर्धा’ कुठे सुरू होते हे स्पष्टपणे दिसू लागले आहे. ठाणे जिल्ह्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील अंतर्गत संघर्ष चुरशीचा होत आहे. आज कल्याण–डोंबिवलीत घडलेल्या नाट्यमय उलथापालथीने हेच चित्र अधिक ठळक झाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनाशिंदे गटाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मंगळवारी भाजपने थेट कोंडी केली. डोंबिवलीचे आमदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अक्षरशः दोन तासांत राजकीय समीकरणे गोलमाल करणारे पावले टाकली. शिंदे गटाला भक्कम मानले जाणारे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अगदी निकटवर्तीय असलेले तालुका प्रमुख महेश पाटील, माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे, युवा सेना पदाधिकारी अनमोल म्हात्रे यांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे शिंदे गटाच्या स्थानिक संघटनेला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर जिवलग असलेले लोकही हातातून निसटत असल्याने शिंदे गटात चिंतेचे वातावरण आहे.

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

दिवंगत ज्येष्ठ नेते व पाच वेळा नगरसेवक राहिलेले वामन म्हात्रे यांचे वारसदार अनमोल म्हात्रे यांचा भाजप प्रवेश हा सर्वात महत्त्वाचा ठरला. अनमोल आणि पत्नी अश्विनी म्हात्रे यांनी चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात मंगळवारी अधिकृत प्रवेश केला. वामन म्हात्रे यांचा कल्याण–डोंबिवलीत ठसा असलेला जनाधार लक्षात घेता, त्यांचा वारस भाजपात जाणे हा शिंदे कुटुंबासाठी मोठा राजकीय धक्का मानला जातो.

त्यापाठोपाठ लगेच दुसरा धक्का चव्हाण यांनी शिंदे गटाला दुसरा धक्का दिला. तालुका प्रमुख महेश पाटील, माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, माजी नगरसेविका सायली विचारे तसेच माजी परिवहन समिती सदस्य संजय राणे यांनीदेखील समर्थकांसह भाजपात प्रवेश करून शिंदे गटातील अंतर्गत गळती अधिक उघड केली. महेश पाटील यांची शिंदे गटाच्या संघटनेतील महत्त्वाची भूमिका आणि त्यांचे चव्हाण यांच्याशी असलेले निकटचे संबंध या प्रवेशाला अधिक वजनदार ठरवतात.

या संपूर्ण घडामोडींकडे पाहता चव्हाण यांनी आपल्या होमग्राउंडवर महापालिका निवडणुकीपूर्वी थेट ‘सर्जिकल स्ट्राइक’ केल्याचे जाणवते. महायुतीमधील मित्रपक्षावरच केलेली ही टार्गेटेड कारवाई चर्चेचा विषय ठरत आहे. ठाणे जिल्ह्यातील महापालिकांमध्ये भाजप विरुद्ध शिंदे गट अशीच चुरस राहणार असल्याचे संकेत आता स्पष्ट दिसत आहेत. दोन्ही बाजूंनी ‘इनकमिंग’ जोरात सुरू असताना, कोणती बाजू स्थानिक पातळीवर वरचढ ठरणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Mumbai News: लिंक रोडसाठी १,०३९ झाडांवर कुऱ्हाड, सर्वोच्च न्यायालयाची मुंबई पालिकेला सशर्त परवानगी

कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीचे वातावरण या घडामोडींमुळे तापले आहे. भाजपने शिंदे गटाच्या बालेकिल्ल्याला दिलेला धक्का, शिंदे गटातील ना थांबणारी गळती आणि महापालिका ताब्यात ठेवण्याची दोन्ही पक्षांची धडपड यामुळे येणारी लढत ही महायुतीतीलच सर्वाधिक रोमहर्षक ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.