आटपाडी: नगरपंचायतीसाठी आज शेवटच्या दिवशी एकूण ९१ त्यात नगराध्यक्ष १२, तर नगरसेवक पदासाठी ७९ अर्ज दाखल झाले. नगराध्यक्षपदासाठी एकूण २२, तर नगरसेवक पदासाठी विक्रमी १९७ अर्जांची संख्या झाली.
नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक लागली आहे. थेट जनतेतून एक नगराध्यक्ष आणि १७ नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी आघाडीने स्वतंत्र पॅनेल मैदानात उतरवण्याच्या दृष्टीने नगराध्यक्ष आणि सर्व प्रभागांत नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल केले.
Sangli News: विटा नगरपरिषदेत उमेदवारीची ‘लाट’; पाच दिवसांत नगराध्यक्षपदासाठी १ आणि नगरसेवकासाठी तब्बल १९ अर्ज दाखल!राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नगराध्यक्ष आणि एक नगरसेवकाचा अर्ज दाखल केला. आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. दिवसभरात ९१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यात १२ नगराध्यक्ष आणि ७९ नगरसेवकपदासाठीच्या अर्जांचा समावेश आहे.
नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अर्जाची संख्या २१९ झाली. आज शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले. काही उमेदवारांनी भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्ष असे तीन-तीन अर्ज दाखल केले. दुपारी तीनपर्यंत अनेक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती. शिल्लक अर्ज राहिल्याने आत असलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सायंकाळी पाचपर्यंत सुरू ठेवली.
Sangli News: पहाटेच्या थरारात ‘चंदा’ची सह्याद्रीत एंट्री; व्याघ्र संवर्धनाला मिळाली नवी उभारी!नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी भाजपने यू. टी. जाधव, तीर्थक्षेत्र विकास आघाडीने सौरभ पोपट पाटील, शिवसेनेने रावसाहेब सागर, राष्ट्रवादी काँग्रेसने पंढरीनाथ नागणे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सादिक खाटीक यांच्या अर्जासोबत पक्षांचे एबी फॉर्म जोडले. त्यामुळे एबी फॉर्म जोडलेल्या पक्षाचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले.
शिवसेना आणि राष्ट्रवादीची दिवसभर सुरू असलेली बोलणी फिस्कटली. अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्यानंतर स्वाभिमानी विकास आघाडी आणि राष्ट्रवादीची एकत्रित निवडणूक लढण्यासंदर्भात बोलणी सुरू झाली होती. त्यांच्यात समझोता झाल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी- स्वाभिमानी युती अशी तिरंगी लढत होऊ शकते.