मंचर, ता. १८ : मंचर नगरपंचायतीच्या सरहद्दीवर असलेल्या अवसरी खुर्द़-कवलीमळा (ता. आंबेगाव) परिसरात बिबट्यांच्या वावराने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रवींद्र वाळके यांच्या घराच्या व्हरांड्यात तीन बिबट्यांनी फेरफटका मारून काहीवेळ विश्रांती घेतली. पण भक्ष न मिळाल्याने बिबटे निघून गेले. मंगळवारी (ता.१८) पहाटे तीनच्या सुमारास तीन बिबट्यांचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यामुळे याभागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
परिसरात बिबट्यांच्या दहशतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी परिसरातील अनेक कुत्रांचा फडशा बिबट्याने पाडला आहे. भरत भोर यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. सध्या बिबट्याच्या टोळीचा वावर वाढल्याने दिवसाही शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयाने तातडीने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा. तसेच बिबट शीघ्र कृती दलामार्फत रात्री गस्त सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले म्हणाले, “बिबट शीघ्र कृती दलामार्फत जनजागृतीचे काम सुरू केले आहे. शेतात काम करताना व प्रवास करताना नागरिकांनी सतर्क राहावे. बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले जातील.”
14593