शिवसेनेला शक्तिप्रदर्शनाची गरज नाही : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ : अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेला (शिंदे गट) शक्तिप्रदर्शनाची गरज नसल्याचे ठाम मत व्यक्त केले. माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी हे विधान केले. खासदार शिंदे म्हणाले, ‘‘शिवसेनेला वेगळं शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही, कारण अंबरनाथ शहरात प्रत्येक वॉर्डात हजारो कार्यकर्त्यांची भक्कम फौज आजही शिवसेनेसोबत ठाम उभी आहे. नगरपालिकेवर अनेक वर्षांपासून भगवा फडकत आला आहे आणि आजही नगराध्यक्षपद आमच्याकडेच आहे.’’
भाजप आणि अजित पवार गटाशी युती न झाल्याबद्दल त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. भाजप आणि अजित पवार गटाशी आमची युतीसाठी चर्चा प्रामाणिकपणे सुरू होती. शेवटच्या क्षणापर्यंत बोलणी झाली, पण अंतिम टप्प्यात युती शक्य झाली नाही. आता सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे अर्ज दाखल केले असले तरी ही लढत वैराची नाही, तर ही मैत्रीपूर्ण स्पर्धा असेल. मनसेबद्दलही त्यांनी सौहार्द दाखवत, ‘‘काही ठिकाणी युती होते, काही ठिकाणी होत नाही. मनसेलाही माझ्या शुभेच्छा,’’ असे ते म्हणाले.
विरोधकांच्या टीकेला उत्तर
डोंबिवलीचे आमदार राजू पाटील यांच्यावरच्या चर्चेला उत्तर देताना त्यांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. ‘‘लग्नसराईमध्ये लोक एकत्र येतात तसं निवडणुकीतदेखील हेवे-दावे होणं साहजिक आहे, पण निवडणूक संपली की कुठलाही भेदभाव न ठेवता आपण सर्वांनी एकत्र काम केलं पाहिजे,’’ असे ते म्हणाले. भाजपकडून होत असलेल्या टीकेवर बोलताना त्यांनी टोलेबाजी केली. ‘‘अंबरनाथमध्ये अनेक विकास प्रकल्प राबवले गेले. तेव्हापर्यंत भाजप आणि अजित पवार गट हेच त्या कामांचे गुणगान गात होते. आता विरोधात बसल्यानंतर त्याच कामांवर टीका करणे हे राजकारणाचं दुहेरी रूप दाखवते. कुणाला काय बोलायचं ते बोलू द्या,’’ असे म्हणत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
उमेदवारी अर्ज दाखल
शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा वाळेकर यांनी अर्ज दाखल केला. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किनिकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. राजेंद्र वाळेकर, निखिल वाळेकर, अब्दुल शेख यांसह अनेक दिग्गज उमेदवारांनी नगरसेवकपदासाठी अर्ज भरले आणि आपला विजय निश्चित असल्याचा निर्धार व्यक्त केला. प्रभाग क्रमांक १७ मधून अर्ज दाखल केलेल्या निनाद करमरकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे शहराध्यक्ष सदाशिव पाटील उभे असल्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची बनली आहे.