Kolhapur News: हेरिटेज रमणमळा तलावाची 'अडगळ यात्रा'! महापालिकेच्या दुर्लक्षामुळे करोडोची जागा ठेकेदाराच्या मुरूमाखाली दडली
esakal November 19, 2025 07:45 AM

कोल्हापूर: महापालिकेच्या हेरिटेज रमणमळा (रेसिडन्सी) तलाव परिसरातील करोडो रुपयांची मौल्यवान जागा ठेकेदाराच्या पाईप, साहित्य, कामगारांच्या झोपड्या आणि मुरूमाच्या ढिगांखाली झाकली गेली आहे.

इतर जागा महापालिकेने भाड्याने देण्याची प्रक्रिया राबवली असताना या जागेचे घोडे कुठे अडले आहे? हा मोठा प्रश्न आहे.सल्लागार नियुक्तीची पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. संवर्धन दूरच असून, जागा महापालिकेला व्यवस्थित राखता येत नसल्याचे दिसत आहे. जुनी झाडे, तलाव, भोवताली जागा असा परिसर असलेला रमणमळा तलाव वीस वर्षांच्या भाडेकराराने दिली होती.

Kolhapur News: ‘मी नाही तर माझा वारस!’ घराणेशाहीचा फटका कार्यकर्त्यांना; ९ नगरपालिकांत नेत्यांच्या कुटुंबीयांचीच उमेदवारी

त्यावेळी त्यामध्ये काही बदल केले होते. जागेचा भाडेकरार संपल्यानंतर २०२२ पासून ही जवळपास चार एकर जागा महापालिकेने ताब्यात घेतली. चार वर्षात त्यात काही केले नसल्याने आता ती जागा महापालिकेने ठेकेदाराचे साहित्य ठेवण्यासाठी दिली आहे.

अमृत योजनेच्या ठेकेदाराने तिथे पाईप ठेवल्या आहेत. कामगारांच्या झोपड्या लावल्या आहेत. ठिकठिकाणी मुरूमाचे ढीग टाकले आहेत. आधीच त्या तलावाचे पाण्याचे मूळ स्रोत बंद झाले आहेत. त्यात जागेच्या अशा वापराने तलावाचे मूळ स्वरूप शिल्लकच राहणार नाही. पाण्याचा जुना स्रोत पूर्ववत केल्यास पाणी साचून तलावाचे अस्तित्व राखले जाण्यास मदत होणार आहे.

Kolhapur Crime News: मार्केट यार्डात धडक कारवाई! जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, तब्बल १४ जणांवर गुन्हा दाखल

त्यानंतर तिथे नवीन कामे करता येतील. मुरूम टाकल्याने जिथे तलाव होता तो परिसर उंच होत आहे. सखल भाग दिसत नाही. यामुळे तलावाचे स्वरूप नष्ट होत जाणार आहे. मध्यंतरी या जागेत अतिक्रमण झाल्याची जाहीर तक्रार झाली होती. त्यामुळे जागा व्यवस्थित राखली जावी, यासाठी महापालिकेने २०२२ मधील नोव्हेंबरमध्ये भोवतीने पत्रे मारले.

वर्षभरात सल्लागार नेमून नवीन भाडेकरूला जागा द्यायची अशी पहिल्या टप्प्यातील योजना होती. सल्लागार नियुक्तीसाठी निविदा मागवल्या होत्या. त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने तीन वेळा मुदतवाढही दिली; पण त्यानंतरही काहीच फरक पडलेला नव्हता. परिणामी जागा सुरक्षित ठेवण्यासाठी महापालिकेने मारलेल्या पत्र्यांसाठी दीड वर्षाहून अधिक काळ भाडे भरण्याची वेळ आली. त्यासाठी लाखो रुपये गेले. आता तर या जागेचे काय करायचे हेच माहिती नसल्यासारखी स्थिती आहे.

इतर जागा जातात, मग...

उत्पन्न वाढीसाठी रिकाम्या जागा भाडेकराराने देण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. त्यानुसार दोन जागांची प्रक्रिया पूर्ण केली आहे. पण, करोडो रुपयांच्या असलेल्या या रमणमळा तलावाच्या जागेबाबत चार वर्षांपासून काहीच केलेले नाही, ही बाब खटकण्यासारखी आहे.

हेरिटेजमध्ये तलाव मोडत असल्याने त्या पद्धतीने विकास करायचा अशी चर्चा होती. मात्र, धोरण अद्यापही ठरलेले नाही. महापालिकेने पत्रे काढल्यानंतर जागा खुली झाल्याने तेथील इमारतींमध्ये अवैध धंदे सुरू झाले. काही ठिकाणी नासधूस झाली. लोखंडी साहित्य चोरीला गेले आहे.

विविध पर्यायांचा विचार हवा

तलावाचा परिसर अतिशय शांत भागात आहे. तलावाची जागा भाडेतत्त्वावर द्यायची झाल्यास वेगळ्या पद्धतीने विकास करता येणे शक्य आहे. सांस्कृतिक सभागृहाचाही विचार करता येऊ शकतो. हेरिटेज तलावाला साजेसे सुशोभीकरण केल्यास या जागेचा लूकच बदलून जाऊ शकतो. फक्त महापालिकेने प्रक्रिया पूर्ण करायची आवश्यकता आहे.

हेरिटेज एकमध्ये हा तलाव आहे. त्यामुळे तलावाचे अस्तित्व जपण्याची फार गरज आहे. त्यामुळे त्यात टाकलेले मुरूमाचे ढीग, कामगारांसाठी तयार केलेल्या झोपड्या काढायलाच हव्यात. तलाव तसेच जैवविविधता जपून विकासाचा विचार करायला हवा.

- उदय गायकवाड, पर्यावरणतज्ज्ञ

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.