High Voltage Political Clash Jaysingpur : (गणेश शिंदे) : कोल्हापूर जिल्ह्यात नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये हळूहळू रंगत चढायला सुरू झाली आहे. काल(ता.१८) जिल्ह्यातील नगरपरिषदांचा अर्ज छाननीचा दिवस हाय व्होल्टेज ड्राम्याने झाला. जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरपरिषदेच्या सभागृहात माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधु नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचे स्विय्य सहायक स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. राजर्षी शाहू आघाडीने शिरोळ तालुका विकास आघाडीवर केलेल्या आरोपावरून जोरदार वाद झाल्याने शिरोळ तालुक्यात चर्चांना उधाण आले. दरम्यान, या घटनेत दोन्ही गटांकडून थेट मंत्र्यांना फोनाफोनी करून दबावतंत्राचा वापर केल्याचीही जोरदार चर्चा रंगली आहे.
जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीच्या प्रक्रियेत शिरोळ तालुका विकास आघाडी अधिकृत नसल्याची हरकत राजर्षी शाहू विकास आघाडीने घेतली. या हरकतीवर दिवसभर सुनावणी सुरू होती. या काळात दोन्ही आघाड्यांच्या समर्थकांमध्ये हेवेदावे सुरू होते. तर निवडणुक निर्णय अधिकारी शिरोळ तालुका आघाडीची भूमिका ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचा आरोप शिरोळ तालुका विकास आघाडीने केला. यावेळी एकच गोंधळ झाला. दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांचे पीए स्वस्तिक पाटील हे वकिलांना मुद्दे सांगत असताना राजर्षी शाहू आघाडीचे नेते संजय पाटील यड्रावकर यांनी "यांचा काय संबंध हे का इथे आले आहेत यांना बाहेर घालवा" असा सवाल निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांना केला.
यावेळी स्वस्तिक पाटील यांनीही "तुमचाही काय संबंध तुम्ही इथं का थांबलाय, हरकत घेणारी व्यक्ती सचिन निटवे आहे. मला जर बाहेर काढायचं असेल तर तुम्हालाही बाहेर यावं लागेल. तसेच माझ्याकडे शिरोळ तालुका विकास आघाडीच्या कागदपत्रांची माहिती आहे. यामुळे आघाडीचा प्रतिनिधी म्हणून मी इथे उभा आहे जर काढायचं असेल तर यांनाही काढा मी बाहेर जातो अशी भूमिका स्वस्तिक पाटील यांनी घेतली. यावर संजय पाटील यड्रावकर म्हणाले मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असल्याचे सांगितलं.
यानंतर निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दोघांनाही म्हणणे मांडण्यास संधी दिली. दरम्यान संजय पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुका विकास आघाडीचे सर्व प्रोसेडिंग मागितले यावर स्वस्तिक पाटील यांनी सर्व प्रोसेडिंग देण्यास आम्ही बांधिल नाही जे हरकत घेतले आहेत त्याच्या सत्य प्रती आम्ही सादर केल्या आहेत. तुम्ही माझ्या पक्षाचे अध्यक्ष नाही तुमच्या सांगण्यावरून आम्ही कागदपत्रे सादर करणार नाही असे म्हणताच पुन्हा वाद झाला. यामुळे सभागृहात वातावरण तणावाचे बनले. दोघांमध्ये झालेल्या खडाजंगीमध्ये शेवटी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली. यावेळी काहीसा वाद शमला असला तरी रात्री उशिरा पर्यंत दोन्ही गटाकडील कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या दारात गर्दी केली होती.
Jaysingpur Politics: निवडणुकीच्या रणधुमाळीत भूमिगत नेते पुढे; सोशल मीडियावर चमक, गल्ल्याबोळात अचानक वावर वाढला!राजू शेट्टींचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन
जयसिंगपूर नगपरिषदेत झालेल्या वादावादीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी यांना फोन करून मेरिटवर निकाल द्या. या सर्व प्रक्रियेत दबाव तंत्राचा वापर झाल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू असा थेट इशारा शेट्टींनी दिला. दरम्यान, रात्री उशिरा ४ तासांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चेअंती निवडणुक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी शिरोळ तालुका विकास आघाडीचे सर्व अर्ज कायदेशिर आणि बरोबर असल्याचे जाहीर केले. यानंतर निवडणुक कार्यालयाबाहेर शिरोळ तालुका विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दरम्यान निकालापूर्वी १ तास आदीच संजय पाटील यड्रावकर यांनी निघून जाणे पसंद केल्याने जोरदार चर्चा रंगली होती.