कोलकाता येथे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना केवळ अडीच दिवसंत गमावला. कोलकाता येथे तोंड पोळल्यानंतर गुवाहाटीमध्ये गंभीर आणि भारतीय संघ अतिशय जपून पाऊल टाकणार यात शंकाच नाही. कारण जे पिच मनासारखं होतं तिथे तयांना तोंडघशी पडाव लागलं, त्यामुळेच आता ते असं पाऊल उचलणार आहेत ज्याचा सल्ला त्यांना क्रिकेट एक्सपर्टकडून कित्येक वर्ष मिळत होता. ईडन गार्डन्सच्या पीचवर झालेल्या टीकेनंतर, बीसीसीआयने (BCCI) गुवाहाटीमध्ये आदर्श खेळपट्टीची मागणी केली आहे. येत्या 22 नोव्हेंबरपासून बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना सुरू होत आहे आणि गुवाहाटीच्या खेळपट्टीवर वेगवान आणि उसळीदार खेळपट्टी असण्याची अपेक्षा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारसापारा येथे लाल मातीच्या पिचचा वापर केला जाईल की नाही हे समोर यायचं आहे. कोलकात्यात वापरल्या जाणाऱ्या काळ्या मातीच्या खेळपट्ट्यांच्या विरुद्ध, लाल मातीचे पीच हे सातत्याने उसळी देतात आणि तितकं लवकर खराब होत नाही. याचा अर्थ असा की पहिल्या कसोटीच्या विपरीत, सामन्यात नंतर फिरकी गोलंदाजी दिसून येण्याची शक्यता आहे.
बोर्डाने कापले गंभीरचे पंख
दरम्यान बीसीसीआयने अखेर कारवाई केली असून गुवाहाटीतील मुख्य क्युरेटर आशिष भौमिक यांना त्यांच्या काय हवंय, कशाची गरज आहे याबद्दल सूचना दिली. गुवाहाटीला “रँक टर्नर” हा टॅग लावावा असे बोर्डाला वाटत नाही, कारण गुवाहाटीत त्यांचा पहिला कसोटी सामना होत आहे. म्हणूनच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत वेगवान आणि उसळी अपेक्षित आहे. चेंडू फिरला तरी तो वेगाने आणि उसळीने फिरेल. यामुळे भारतीय फलंदाजांसाठी परिस्थिती सोपी होणार नाही, पण कोलकात्यात जे घडले त्यापेक्षा ते अजूनही चांगले आहे. पहिल्या दिवसापासूनच (चेंडू) असमान उसळी घेणार नाही याचीही बीसीसीआय खात्री करत आहे. भारतातील खेळपट्ट्या तुटतात आणि अनियमित उसळीमुळे फलंदाजांना संघर्ष करावा लागतो हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, ऐतिहासिकदृष्ट्या, हे फक्त तिसऱ्या दिवशी घडले आहे. ईडन गार्डन्समध्ये असे घडलेले नाही. बोर्डाला गुवाहाटीमध्ये कोलकात्याच्या घटनेची पुनरावृत्ती नको आहे.
लाल माती लाज वाचवणार का ?
बारसापारा येथील खेळपट्टी लाल मातीपासून बनलेली आहे, ज्यामुळे ती वेगवान आणि उसळी घेण्याची शक्यता जास्त असते. भारतीय संघाने स्थानिक हंगामापूर्वी त्यांच्या मागण्या स्पष्ट केल्या होत्या. म्हणूनच, जर पिचमधून टर्न मिळत असेल तर ती वेगाने आणि उसळीसह टर्न देईल. बाउन्समध्ये कोणतेही मोठे चढउतार होऊ नयेत यासाठी क्युरेटर प्रयत्न करत आहेत. येथील खेळपट्ट्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वांना संधी दिली आहे, त्यामुळे मालिकेतील दुसरा कसोटी सामना इंग्लंडमधील खेळपट्ट्यांसारख्याच खेळपट्ट्यावर खेळवला जाण्याची अपेक्षा आहे. याने तरी भारतीय संघाला फरक पडेल का आणि विजयी पताका पुन्हा लहरेल का याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे.