अंबरनाथमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२९व्या संजीवन समाधीनिमित्त ज्ञानेश्वरी पठण
esakal November 19, 2025 06:45 PM

अंबरनाथमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२९व्या संजीवन समाधीनिमित्त ज्ञानेश्वरी पठण; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
अंबरनाथ, ता. १७ (वार्ताहर) ः संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ‘सकाळ एनआयई’तर्फे अंबरनाथमध्ये ज्ञानेश्वरी पठण कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (ता. १७) गावदेवी विभागातील भगिनी मंडळ संचालित सुहासिनी अधिकारी प्राथमिक विद्यालयात करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थिती लावत या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे दीडशेहून अधिक विद्यार्थी व पालक सहभागी झाले.
मुख्याध्यापिका विशाखा गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सामूहिक ज्ञानेश्वरी पठण करत कार्यक्रमाचे मुख्य सत्र पार पडले. संत ज्ञानदेवांनी इ.स. १२७५ मध्ये रचलेल्या भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून वारकरी परंपरेचा संस्कार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या कार्यक्रमातून साधला. याप्रसंगी पालक पुष्पा महाजन यांनी ‘तुझ्यासाठी आलो देव दर्शनाला’ हा अभंग सादर करून कार्यक्रमाला रंग चढवला. यावेळी शकुंतला घारे, माया मिस्त्री, रोहिणी साबळे, दीपा रावते, नीता माने, महिला शिपाई कांताबाई पानसरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा अविनाश तेलगोटे यांनी केले. विद्यार्थ्यांना ‘सकाळ’ एनआयईचा विशेष अंकही वाटप करण्यात आला.


संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ‘सकाळ एनआयई’तर्फे आयोजित ज्ञानेश्वरी पठण कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग दिला. लहानग्यांनी सामूहिक पठणातून वारकरी परंपरेचे संस्कार अनुभवले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अध्यात्म, संस्कार आणि संस्कृतीचे मोलाचे संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू यशस्वीपणे साध्य झाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.