काल अचानक मंत्रिमंडळाच्या बैठकीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला. त्यावरुन मोठा राजकीय गदारोळ पहायला मिळाला. एकटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित होते. अन्य मंत्री तिथे नव्हते. राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या. परस्परांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या फोडाफोडीवरुन महायुतीतच घमासान पहायला मिळालं. शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आपली नाराजी त्यांच्या कानावर घातली. त्यावेळी फडणवीसांनी काही गोष्टी त्यांन समजावल्या. आज मंत्री आणि महाडचे आमदार भरत गोगावले या विषयावर बोलले आहेत.
“पक्ष प्रवेश करून घेताना आचारसंहिता पाळावी, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितले आहे. कुठल्याही युतीत थोडे-फार मतभेद असतातच, पण आमची युती ही पूर्णपणे वेगळ्या धरतीची आहे. आम्ही नॅचरल अलायन्स आहोत, त्यामुळे यात आमच्यासाठी कोणतीच अडचण नाही” असं भरत गोगावले म्हणाले. “सुनील तटकरे हे जुने खेळाडू आहेत आणि आम्ही सुद्धा नव्या दम्याचे आहोत. दूध का दूध, पानी का पानी तीन तारखेला सर्व स्पष्ट होऊन जाईल” असंभरत गोगावलेम्हणाले.
दोन दिवसांत समन्वय समितीची बैठक
“उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली. तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचे आणि भाजपाने केले तर चालणार नाही, असे होणार नाही. येथून पुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका. पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावं” असं मुख्यमंत्र्यांनी शिवसेना मंत्र्यांना सांगितलं. डोंबिवलीत काल शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला भाजपत प्रवेश देण्यात आला. त्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर हे सर्व घडलं. येत्या दोन दिवसांत याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात समन्वय समितीची बैठक होणार आहे.
एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला
कल्याण-डोंबिवली हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. तिथल्या माजी शिवसेना नगरसेवकाला भाजपत प्रवेश देणं शिवसेना मंत्र्यांना पटलं नाही. “भाजपमधील नेते आमचे फोन उचलून बोलतात. मात्र आमच्या नेत्यांचे पीए सुद्धा फोन उचलत नाहीत. यामुळे अंतर्गत नाराजी भरपूर आहे. काल प्रवेश झालेल्या काही नेत्यांनी आम्हाला सांगितलं” असं कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले.