मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना पुन्हा दणका, 45 वर्षे सोबत असलेला शिलेदार फोडला
Tv9 Marathi November 19, 2025 08:45 PM

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीत अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. बऱ्याच नेत्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडत महायुतीतील पक्षात प्रवेश केला आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मोठा दणका दिला आहे. 45 वर्षे उद्धव ठाकरेंची साथ देणाऱ्या एका नेत्याला आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. या नेत्यासह असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. हा नेता कोण आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राजेंद्र झावरे यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिकेच्या उबाठा गटाचे माजी नगराध्यक्ष आणि सह संपर्कप्रमुख राजेंद्र झावरे यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झावरे यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव यांचाही शिवसेनेत प्रवेश

राजेंद्र झावरे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहिल्यानगरचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, विधानसभा प्रमुख किरण खर्डे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इरफान शेख, उप शहरप्रमुख विकास शर्मा, शेखर कोलते, बाळासाहेब साळुंखे, राहुल देशपांडे, अमजद शेख, सतीश शिंगणे, वैभव गीते, विजय सोनवणे, विजय शिंदे, वर्षाताई शिंगाडे, सलीम कांदेवाले, अरुण बोर्डे, श्रीरामपूरचे दत्तात्रय खेमकार, शिरूरच्या रोहिणी बनकर, सुनील बाफना, किरण बनकर तसेच तळेगाव दाभाडे येथील लीना कामत यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

📍 ठाणे

शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिकेच्या उबाठा गटाचे माजी नगराध्यक्ष आणि सह संपर्कप्रमुख राजेंद्र झावरे यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश… pic.twitter.com/E9PczjolQk

— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc)

काय म्हणाले राजेंद्र झावरे?

राजेंद्र झावरे हे गेल्या 45 वर्षांपासून शिवसेनेत होते. या पक्ष प्रवेशाबाबत बोलताना राजेंद्र झावरे म्हणाले की, ‘मी 45 वर्षांपासून शिवसैनिक आहे. शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख, लोकनियुक्त नगराध्यक्ष, जिल्हा सहसंपर्कप्रमुख अशी विविध पदे सांभाळण्याची संधी मला मिळाली. माझ्या मनात आपल्याबद्दल मनात प्रचंड आदर आहे. परंतु आता आपल्या पक्षात काम करणे शक्य नाही.’ दरम्यान, राजेंद्र झावरे यांच्या शिवसेना प्रवेशाने कोपरगावमधील राजकारणाला वेगळे वळण मिळणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.