नाशिक : जर समोर असता तर उभा कापून काढला असता, असे म्हणत मालेगावच्या (Nashik) डोंगराळे येथील 3 वर्षाच्या चिमकुलीवरील अत्याचाराच्या घटनेवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला. मालेगावच्या डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार व खुनाच्या घटनेनंतर पीडित कुटुंबीयांची चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी भेट घेतली. पीडित कुटुंबियांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे, आरोपीला कायद्याच्या चौकटीत राहून फाशीची शिक्षा होईल, असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला. दरम्यान, पीडित चिमुकलीच्या कुटुंबीयांनी चित्रा वाघ यांच्यासमोर टाहो फोडला, तेव्हा चित्रा वाघ यांनाही अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
कुठल्या शब्दाने सांत्वन करू, तीन-साडेतीन वर्षाच्या निरागस मुलीवर राक्षसी प्रकार झाला. या घटनेमुळे प्रत्येक आईचं काळीज रडत असेल, अत्याचार करुन राक्षसी पद्धतीने तिची हत्या करण्यात आली. मी एक आई, एक महिला आणि या राज्याची मुलगी म्हणून सांगते कायद्यात तरतूद राहिली असती तर त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. प्रचंड जनप्रक्षोभ आहे, या हरामखोराला फाशी व्हायला हवी. घटना घडल्याच्या दिवसापासून मुख्यमंत्री यावर लक्ष ठेवून आहेत. एकही छोट्यातल्या छोटा पुरावा सुटता कामा नये, या सैतानाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहोत. यांना ठेचून काढणे ही काळाची गरज आहे. अर्ध्या तासामध्ये पोलिसांनी त्याला शोधून काढला, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी, मरेपर्यंत फाशी व्हायला पाहिजे. पालक म्हणून आपणही जागरूक राहणे आवश्यक आहे. त्याला फाशीच होणार, हा देवा भाऊंच्यावतीने मी शब्द देते, असेही चित्रा वाघ यांनी म्हटलं. चांगल्या वकिलाकडे ही केस द्यावी यासाठी मी उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. कायद्याच्या चौकटीत राहून जे काही याच्यात करता येईल ते सगळे प्रशासन, पोलीस करत आहेत. लवकरच चार्टशीट दाखल केली जाईल, असेही वाघ यांनी म्हटले.
नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय बालिकेचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचारानंतर तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या घटनेचे राज्यभरातून निषेध नोंदविण्यात येत आहे. या प्रकारातील आरोपीला फाशीची शिक्षा करावी, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालाववा अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसह डोंगराळे येथे येऊन पीडीत चिमुकलीच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. संबंधित नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु असून हा खटला जलदगतीने न्यायालयात चालविण्यात येईल, असे आश्वासन वाघ यांनी पीडीत कुटुंबीयांना दिले. समोर असता तर उभा कापून काढला असता अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली. यावेळी, कुटुंबीयांनी वाघ यांच्याकडे न्यायाची मागणी करीत हंबरडा फोडला, घरातील विदारक परिस्थिती पाहून चित्रा वाघ यांना अश्रू अनावर झाले होते.
आणखी वाचा