राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रासंदर्भातील जीआर रद्द केल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे वरळीमध्ये आयोजित विजयी मेळाव्यात प्रथमच एकत्र आल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यानंतर अनेकदा वेगवेगळ्या कारणा निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेत जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीमध्ये मनसेला 70 च्या आसपास जागा देण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटाकडून दर्शवण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत आणखी काही फेऱ्या होऊन जागा वाटप निश्चित करण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे, त्यामुळे सध्या तरी जागा वाटपासंदर्भात दोन्ही पक्षांमध्ये कोणताही अधिकृत फॉर्म्यूला ठरलेला नाहीये.
दोन्ही पक्षांकडून जागा वाटपासंदर्भातील चर्चेला सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे. मनसे आणि शिवसेना युतीमध्ये मनसेला 70 ते 75 जागा सोडण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटाची आहे, अशी माहिती समोर येत आहे, आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर मनसेच्या अनेक बैठका पार पडल्या होत्या, त्यामध्ये मनसेकडून 125 जागा लढण्याची तयारी दर्शवण्यात आली होती. मात्र आता युतीसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाकडून मनसेला 70 ते 75 जागा देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. एकीकडे मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. काँग्रेसने मनसेसोबत जाण्यास नकार दिला आहे, या सर्व पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.