नागपूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हनुमाननगर झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ३४ मधील नागरिकांनी आपल्या भागातील मूलभूत सुविधांच्या अभावाकडे आणि समस्यांकडे उमेदवारांचे लक्ष वेधले आहे. शाहूनगर, ओंकारनगर, रहाटेनगर टोली, रामटेकेनगर, मानेवाडा-बेसा परिसर अशा विविध भागांना जोडणाऱ्या या प्रभागात मानेवाडा-बेसा रस्त्याची दुरवस्था, सिमेंटीकरणामुळे घरात घुसणारे पाणी आणि सततची वाहतूक कोंडी या सर्वांत ज्वलंत समस्या ठरल्या आहेत.
रस्त्यावरील खड्डे, अतिक्रमण आणि फुटपाथवरील अनधिकृत व्यवसायांमुळे नागरिकांना रोजच्या प्रवासात प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. रिंग रोडवरील शताब्दीनगर चौक ते हुडकेश्वर पोलिस स्टेशन हुडकेश्वर आणि मागे ग्रामीण भाग लागेपर्यंत, अशी मोठी बॉर्डर प्रभागाची आहे. या भागात रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र, नागरी सुविधेच्या अनुषंगाने काही गोष्टींची पूर्तता होणे अपेक्षित आहे. रहाटेनगर टोली, रामटेकेनगर या वस्त्या मांग गारोडी समाजाच्या आहेत. येथे रस्ते, पाणी, नागरी सोयी- सुविधा पोहोचल्या आहेत; पण सामाजिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून काम झालेले नाही. प्रभागाची लोकसंख्या ६५ हजारांवर आहे. दक्षिण नागपुरात ४५ बूथ असून, १८ बूथ दक्षिण नागपूर विधानसभेत येतात.
Kolhapur News: हुपरीतील ‘चंदेरी नगरी’चा तेज हरपला; पाणीपुरवठा, अतिक्रमणे आणि निकृष्ट कामांमुळे नागरिक त्रस्त!हा प्रभाग तसा ओबीसीबहुल आहे; पण अनुसूचित जातीचे मतदारही १३ हजारांवर आहेत. अनुसूचित जमातीचीही मतदार संख्या ६ हजारांवर आहे. अनुसूचित जमातीमध्ये हलबा समाजाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या प्रभागात यंदाही एससी आणि एसटीसाठी ज्ञागा आरक्षित होणार हे नक्की. हा प्रभाग दक्षिण आणि दक्षिण- पश्चिम विधानसभेमध्ये येतो. मोहन मते हे दक्षिणचे आमदार असले तरी या प्रभागात माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्या अस्तित्वाला जास्त मान आहे. त्यामुळे या प्रभागात भाजपाच्या दोन नेत्यांचे गट आहेत.
पदाधिकाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ
साडेतीन वर्षे निवडणुका प्रलंबित राहिल्याने २०१७ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांबरोबरच इतर पदाधिकाऱ्यांचीही संख्या वाढली. दक्षिण नागपुरात अनेक वर्षांपासून संघर्ष करणारे गिरीश पांडव यांच्याबरोबरच काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे यांनीही दक्षिण नागपुरात स्वत:चे वर्चस्व वाढविले आहे. या प्रभागातील अनेक मुद्दे काँग्रेसने उचलले. पण त्याची अंमलबजावणी भाजपाच्या लोकांनी केली. त्यामुळे काँग्रेसचे अस्तित्व येथून हळूहळू हरवत गेले. २०१७ मध्ये शिवसेनेतून उमेदवारांची आयात करावी लागली. काँग्रेसमध्येही इच्छुकांची संख्या बऱ्यापैकी आहे.
प्रभागातील वस्त्या
मानेवाडा, मानेवाडा घाट, विणकर कॉलनी, गजाननगर, ओंकारनगर, श्रीहरीनगर १ व २, शाहूनगर, जानकीनगर, जयभोलेनगर, बाबाभोलेनगर, शिवशकक्तीनगर, अध्यापकनगर, महाकालीनगर, विज्ञाननगर, आकाशनगर, जयहिंदनगर, रामटेकेनगर, रहाटेनगर टोली.
प्रभाग क्रमांक - ३४
मतदार - ६५ हजार ५०६
अ. जा. - १३ हजार ७८
अ. ज. - ५ हजार ८९५
आरक्षण
एससी
एसटी - महिला
ओबीसी - महिला
सर्वसाधारण
भागातील समस्या
उद्यान व खेळण्याच्या सुविधांचा अभाव : शाहू नगर भागात नागरिकांसाठी कोणतेही गार्डन नाही. लहान मुलांना खेळण्याची मैदाने किंवा साधने उपलब्ध नाहीत. ज्या काही उद्यानांचे आरक्षण आहे, त्यांची देखभाल-दुरुस्ती पूर्णपणे बंद आहे. ग्रीन जिममधील उपकरणे मोडकळीस आली असून त्यांची दुरुस्ती वर्षानुवर्षे रखडली आहे. पावसाळी ड्रेनेजची वाईट अवस्था : पावसाळ्यात अनेक रस्ते व गल्ल्या नदीचे रूप धारण करतात. ड्रेनेज लाइनची पूर्णतः दुरावस्था असल्याने पाणी साचते. सिमेंट रस्ते उंचावल्याने घरांची पातळी खाली राहिली असून, पावसाचे पाणी थेट घरात शिरते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधांचा अभाव : प्रभागात ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणतेही विरंगुळा केंद्र किंवा विश्रांती स्थळ नाही. अतिक्रमणाची व्यापक समस्या : मानेवाडा चौक, औकारनगर ते बेसा रोड, फुटपाथ अशा ठिकाणी अनधिकृत अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे. मंगल कार्यालये, लॉन्स आणि बीअर बारांना स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नसल्याने लग्नसमारंभ किंवा कार्यक्रमांच्या वेळी रस्त्यांवर किंवा निवासी वस्तीतच वाहने उभी केली जातात, ज्यामुळे वाहतूक कोंडी आणखी गंभीर होते.
विजेवर अवलंबून असलेली रखडलेली कामे : महावितरणची सब-स्टेशने मंजूर झाली असूनही जागेअभावी कामे रखडली आहेत. परिणामी वीजपुरवठ्यात अनियमितता आणि लोडशेडिंगचा त्रास कायम आहे. सामाजिक व शैक्षणिक विकासाकडे दुर्लक्ष : रहाटेनगर टोली आणि रामटेके नगरात सामाजिक विकासाची कामे शून्यावस्थेत आहेत. टोली परिसरात वाचनालय, महापालिकेची शाळा किंवा मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी कोणतीही योजना राबविली जात नाही.