आरती दलाल-धारकर
नागपूर : जागतिक महिला दिन, बालक दिन यासारखे दिवस सर्वत्र साजरे होताना दिसतात. पण जागतिक पुरुष दिन साजरा होताना दिसत नाही. पण गेल्या काही काळापासून पुरुष दिन साजरा करण्याची संकल्पना डोकावू पहात आहे. तरीही त्याबाबतीत दुमत आहेच. पुरुष दिन साजरा करण्याची गरज काय? असे म्हणणाऱ्यांचा एक गट आहे, तर पुरुष दिन का साजरा करू नये? असेही काहींचे मत आहे. एकूणच काय तर एका नाण्याला कायम दोन बाजू असतात. याविषयी समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात वावरणाऱ्या काही पुरुषांचे याविषयी मत जाणून घेतले आणि लक्षात आले की खरचं पुरुष दिन का साजरा करू नये?
यंदाच्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची थीम आहे, ‘सेलिब्रेटिंग मेन ॲण्ड बॉईज्’, एका आकडेवारीनुसार भारतात दर तासाला १ पुरुष आत्महत्या करतो. वर्षभरात १ लाख २० हजार पुरुषांनी आपले आयुष्य संपविले आहे. महिलांच्या तुलनेत हे प्रमाण २.५ पट जास्त. यंदाच्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची थीम म्हणजे पुरुषांच्या मानवी अस्तित्वाचा उत्सव आहे. पुरुष दिन साजरा करणं म्हणजे पुरुषांना एखादा पुरस्कार देणं नव्हे, तर पुरुषांनाही भावना असतात, त्यांनाही मन असतं हे स्वीकारून त्यांचं माणूस म्हणून अस्तित्व स्वीकारणं होयं.
या संदर्भात समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील पुरुषांकडून जाणून घेतलेल्या काही प्रतिक्रिया
पुरुष दिन साजरा करणे चुकीचे नाही, तर योग्यच आहे. कारण आमच्याकडे समुपदेशन घेण्यासाठी जे पुरुष येतात ते घर आणि नोकरी यांच्या जबाबदाऱ्यांमुळे डिप्रेशन आलेले असतात. त्यांना कोणासमोर व्यक्तच होता येत नाही. अशा वेळी पुरुषांना समुपदेशनाची गरज पडते. पुरुष दिन साजरा केला, तर ते समजूतदार समाजाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल ठरेल.
- डॉ. प्रवीण नवखरे, मानसोपचार तज्ज्ञ
जर पुरुष दिन साजरा केला, तर तेही एका सुदृढ समाजाच्या दिशेने ठोस पाऊल ठरेल. पुरुषांच्याही कार्याची दखल अशी वेगळ्याने कधी घेतली जात नाही. पुरुषांनाही त्यांच्या चांगल्या कामाची पावती वर्षातून एक दिवस मिळाली, तर त्यात वावगे काय?
- प्रवीण मुळे, क्षेत्रीय व्यवस्थापक
लोटे परिसरात नद्या, आकाश काळवंडलयआपल्याकडे स्त्री-पुरुष समानता असली, तरी पुरुषांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तेवढा व्यापक नाही. त्यामुळे पुरुष दिन साजरा करायला सुरुवात केली, तर पुरुषांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. तो ही काम करतो, त्यालाही समाजात मानाच स्थान हवं असतं. त्यालाही स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी हवी असते. तो सतत काम करत असतो. त्याला कौतुकाची थाप मिळाली की त्यालाही स्वतःविषयी अभिमान वाटेल.
- ॲड. आकाश हिवराळे, विद्यार्थी प्रतिनिधी, विदर्भ
आजच्या काळात पुरुष दिन साजरा करण्याची नितांत गरज आहे. पुरुष कधी रडत नाही किंवा पुरुष नेहमी मजबूत असतो अशा चौकटीत त्याला बंदिस्त करून ठेवले जाते. पण वास्तवात त्यालाही आधाराची गरज असते. त्यांच्या डोक्यावर असलेल्या ताणाबद्दल, जबाबदाऱ्या सांभाळताना होणाऱ्या थकव्याबद्दल बोलणार कोण? आपण स्त्री-पुरुष समानतेबद्दल बोलतो, पण समाज आजही पुरुषाचे घरासाठी झटणे कुणी मान्य करत नाही.
- समीर रामटेके, कलाकार
आम्ही पुरुष दिन साजरा करण्याच्या समर्थनात आहोत. कारण सध्या आपला देश फक्त नावालाच पुरुष प्रधान राहिला आहे. स्त्रीच्या बाजूनी अनेक कायदे आहेत. पण पुरुषांच्या संरक्षणासाठी कायदे नाहीत. त्यामुळे पुरुषांच्याही बाजूने कायदे व्हावेत यासाठी आम्ही २००५ पासून लढा देत आहोत.
- राजेश वखारिया, सेव्ह इंडिया फॅमिली फाऊंडेशन