IND vs SA 2nd Test: दुसऱ्या कसोटीत या तीन चुका केल्या तर पराभव निश्चित! काय ते समजून घ्या
GH News November 19, 2025 09:11 PM

भारत दक्षिण अफ्रिका कसोटी मालिका आता रंगतदार वळणावर आली आहे. दक्षिण अफ्रिकेने पहिला कसोटी सामना जिंकून भारतीय संघाला संभ्रमात टाकलं आहे. आता भारतीय संघावर मालिका गमवण्याची वेळ आली आहे. दक्षिण अफ्रिकेने भारतीय संघाला पहिल्या सामन्यात विजयासाठी फक्त 123 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठताना भारताने 93 धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेने भारताला 30 धावांनी पराभूत केलं. न्यूझीलंडनंतर दक्षिण अफ्रिकेने भारतीय संघाला आपल्याच भूमीत पराभूत केलं. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अवघ्या तीन दिवसात संपलेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी चुकांचा पाढा वाचला. त्यात कर्णधार शुबमन गिलला मानेची दुखापत झाल्याने 10 फलंदाजांसह खेळावं लागलं. त्यामुळे आधीच पाय खोलात गेला. आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही पराभवाची भीती आहे. कारण भारतीय खेळाडूंचा खेळ पाहता काहीही होऊ शकतं अशी स्थिती आहे. सर्वात मोठं म्हणजे बेजबाबदारपणे खेळण्याची वृत्ती भारतीय क्रिकेटपटूंमध्ये बळावली आहे. त्याचा फटका टीम इंडियाला बसला आहे.

ही तीन कारणं भारतीय संघाला महागात पडतील

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांना आणखी जबाबदारीने खेळावं लागेल. पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात आघाडीचे फलंदाज फेल गेले. असं वाटत होतं की गल्ली क्रिकेट खेळत आहेत. दक्षिण अफ्रिकन गोलंदाजांसमोर अक्षरश: नांगी टाकल्याचं दिसलं. वाईट खेळूनही पश्चाताप काही दिसला नाही. असंच राहीलं तर दुसरा कसोटी सामना हातातून गमवण्याची वेळ येईल. जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल, अन्यथा दुसरा कसोटी सामना गमवण्याची वेळ येईल. ऋषभ पंत आक्रमक खेळी करतो पण त्यातही बॅट चालली तर चालली. एखाद दुसरं शतक लागलं की संघात जागा फिक्स होते. नाही तर संघ अडचणीत येतो. त्यामुळे त्यालाही जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल.

भारतीय फलंदाज फिरकीला चांगलं खेळतात अशी ख्याती आहे. पण मागचे काही सामने पाहता याला नजर लागली असंच म्हणावं लागेल. फिरकीच्या तालावर भारतीय फलंदाज नाचत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामनयात फिरकीपटूंविरुद्ध मजबूत फलंदाजी करावी लागणार आहे.

दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांना कमी लेखण्याची चूक महागात पडली आहे. खरं तर दुसऱ्या डावात 100 च्या आत गुंडाळण्याची संधी होती. पण शेपटच्या फलंदाजांनी भारतीय माऱ्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. शेपटच्या फलंदाजांनी ज्या काही धावा केल्या. त्यामुळे भारताच्या पराभवाची स्क्रिप्ट लिहिली गेली. दुसऱ्या कसोटीत हीच चूक महागात पडणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.