Land Measurement : वडिलोपार्जित जमिनीच्या मोजणी शुल्कात मोठी कपात; आता प्रतिहिस्सा फक्त २०० रुपये, शेतकऱ्यांना दिलासा
esakal November 19, 2025 05:45 PM

पुणे : शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनीच्या हिश्श्याची मोजणी करण्यासाठी आता प्रत्येक पोटहिश्श्यासाठी केवळ दोनशे रुपये इतकेच माफक शुल्क आकारले जाणार आहे. या निर्णयामुळे नोंदणीकृत वाटणीपत्राच्या आधारे जमिनीचे विभाजन करून घेणाऱ्या शेतकऱ्यांचा मोजणीवरील मोठा आर्थिक भार कमी होणार आहे.

यापूर्वी वडिलोपार्जित जमिनीच्या मोजणीसाठी प्रतिहिस्सा एक ते १४ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात होते. ज्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण पडत होता. तो आता प्रतिपोटहिस्सा २०० रुपये निश्चित करण्यात आला आहे. ही योजना भूमी अभिलेख विभागाकडून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आली आहे. तसे पत्र जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी काढले आहे.

Satara Crime:'साताऱ्यात पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तिघे जेरबंद'; तालुका पोलिसांची माेठी कारवाई; लाखाेंचा ऐवज जप्त..

भूमी अभिलेख विभागाच्या महाभूमी अभिलेख या संकेतस्थळावर ‘एकत्र कुटुंब पोटहिस्सा मोजणी’ प्रकार ‘ई-मोजणी व्हर्जन २.०’ या संगणक प्रणालीत त्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्काबाबत स्पष्टता येण्यास मदत होणार आहे. तसेच पोटहिस्सा मोजणीची प्रक्रिया सुलभ आणि स्वस्त होणार आहे. कुटुंबांतर्गत जमिनीच्या वाटणीच्या वादावर निर्माण होणारे वाद मिटण्यासही यामुळे मदत होईल.

मोजणीसाठी आवश्यक बाबी
  • अर्ज करताना वाटणीपत्र तहसीलदार यांच्या परवानगीचे अथवा रजिस्टर केलेले असावे

  • अर्जासोबत ते जोडल्यानंतर भूमी अभिलेख विभागाच्या मुख्य कार्यालयातील सहायक अधिकारी त्याची तपासणी करतील

  • सिटी सर्व्हेसाठीदेखील ही योजना लागू करण्यात आली आहे.

कायदेशीर आधार प्राप्त
  • अनेकदा वडिलोपार्जित जमिनीचे कागदोपत्री वाटप केले जाते, त्याला कायदेशीर आधार प्राप्त होत नाहीत.

  • भविष्यात त्यावरून वाद सुरू होतात. ते कमी करण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.