राज्यसभेचे खासदार सदानंद तनावडे यांनी गोवा लॅक्रॉस असोसिएशनचं (GLA) अध्यक्षपद स्वीकारलं आहे. राज्यभरात लॅक्रॉस या खेळाचा विस्तार आणि त्याचं व्यावसायिकीकरण करण्याच्या प्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सदानंद तनावडे यांच्या नेतृत्वाखालील नव्या समितीत वरिष्ठ उपाध्यक्ष तेजेंद्र लवांडे, उपाध्यक्ष जयेश नाईक, नावेद तहसीलदार आणि माधवी शेट्ये, सचिव मंगेश पवार, खजिनदार वृशाली कार्डोजो, संयुक्त खजिनदार भार्गव देसाई आणि सदस्य अमोघ अरळेकर, शमसुद्दीन सी. के. आणि सुदेश गवकर यांचा समावेश आहे. तर मनोज पाटील आणि गौतम खारांगेकर हे सल्लागार म्हणून काम पाहतील.
लॅक्रॉसचा प्रसारअध्यक्षपद स्वीकारल्यानंतर सदानंद तनावडे यांनी गोव्यातील आयोजित पत्रकार परिषदेत लॅक्रॉसच्या विकासाबाबत आपली दृष्टी स्पष्ट केली. राज्यात लॅक्रॉस हा खेळ सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत गोवा बॉइज आणि गोवा गर्ल्स या संघांनी नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकत उत्कृष्ट कामगिरी केल्याचा विशेष उल्लेष त्यांनी केला. लॅक्रॉस या खेळाचा प्रसार शाळांपासून प्रत्येक तालुक्यापर्यंत करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच यावेळी त्यांनी गोवा सरकारचेही आभार मानले. क्रीडेशी संबंधित गोव्यातील सक्षम पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर लॅक्रॉस या खेळाच्या विकासासाठी करता येईल, असं ते म्हणाले. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिट इंडिया मिशनशी जीएलए वचनबद्ध असल्याचंही त्यांनी नमूद केलं. “लॅक्रॉस या खेळामुळे युवा पिढीत तंदुरुस्ती, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतो. आगामी काळात गोवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लॅक्रॉस स्पर्धांचं केंद्र बनू शकतं”, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भारत-रशिया लॅक्रॉस एक्स्चेंज प्रोग्रॅमया पत्रकार परिषदेत रशिया लॅक्रॉस फेडरेशनचे अध्यक्ष आणि दोन वेळा वर्ल्ड लॅक्रॉस चॅम्पियनशिप खेळाडू दिमित्री खामिन यांनी भारत-रशिया लॅक्रॉस एक्स्चेंज प्रोग्रॅमचा प्रस्ताव जाहीर केला. या विशेष कार्यक्रमांतर्गत दोन्ही देशांच्या संघांना मैत्रीपूर्ण सामन्यांसाठी एकमेकांना भेट देता येईल. ते या आठवड्यात गोव्यातील विविध शाळांसाठी तीन ते चार प्राथमिक लॅक्रॉस प्रशिक्षणाची शिबिरं घेणार असून गोवा राज्य संघासाठी ते एक विशेष प्रशिक्षण सत्रही आयोजित करणार असल्याची माहिती जीएलएचे सचिव मंगेश पवार यांनी दिली. खामिन यांनी 2014 (अमेरिका), 2018 (इस्रायल) मधील वर्ल्ड लॅक्रॉस चॅम्पियनशिप तसंच 2016 (हंगेरी) मधील युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये रशियाचं प्रतिनिधित्व केलं होतं.
वीकेंड ट्रेनिंग कॅम्प्सगोवा ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस गुरुदत्त भक्त यांनी राज्यातील लॅक्रॉस खेळाडूंना विशेष मार्गदर्शन केलं. कठोर मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर मिळालेल्या संधीचं सोनं करा, असं ते म्हणाले. तर वरिष्ठ उपाध्यक्ष तेजेंद्र लवांडे यांनी शाळा-जिल्ह्यापासून राज्य स्तरापर्यंत जाणाऱ्या डेव्हलपमेंट मॉडेलची रचनात्मक पद्धतीने मांडली केली. सचिव मंगेश पवार यांनी पेड्डेम आणि पोंडा इथं नियमित वीकेंड ट्रेनिंग कॅम्प्स सुरू राहणार असल्याची माहिती दिली. ही शिबिरं स्वत: मंगेश पवार आणि प्रशिक्षक मोईश देवप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली जातील. राज्यातील सर्व मुलांना या प्रशिक्षणासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.
रवी किशन यांच्याकडून राष्ट्रीय महासंघाचं नेतृत्वया कार्यक्रमाच्या निमित्ताने गोवा लॅक्रॉस असोसिएशनने गोवा संघांचा विशेष गौरव केला. 2024 मध्ये आग्रा इथं झालेल्या ज्युनिअर नॅशनल्समध्ये गोवा गर्ल्स टीमने रौप्य पदक पटकावलं होतं. तर 2015 मध्ये आग्रा इथंच झालेल्या सब ज्युनिअर नॅशनल्समध्ये गोवा बॉइज टीमने रौप्य पदक मिळवलं होतं. या दोन्ही संघांचा याठिकाणी सत्कार करण्यात आला. जीएलए ही गोवी ऑलिम्पिक असोसिएशन आणि लॅक्रॉस असोसिएशन ऑफ इंडिया (राष्ट्रीय महासंघ) यांच्याशी संलग्न संस्था असल्याचंही नमूद करण्यात आलं. या राष्ट्रीय महासंघाचं नेतृत्व गोरखपूरचे खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते रवी किशन करत आहेत.