CJI BR Gavai : "मी बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..."; निवृत्तीपूर्वी बीआर गवई काय म्हणाले? बाबासाहेबांचे मानले आभार, सर्वजण स्तब्ध!
esakal November 21, 2025 06:45 PM

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी आपल्या निवृत्तीपूर्वीच्या निरोप समारंभात बौद्ध धर्म आणि आपल्या वैयक्तिक श्रद्धांबाबत अत्यंत मनमोकळेपणाने आपले मत मांडले. सुप्रीम कोर्ट अॅडव्होकेट्स-ऑन-रेकॉर्ड असोसिएशनने (SCAORA) आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थित वकील, न्यायमूर्ती आणि मान्यवरांसमोर थक्क करणारे विधान केले.

मी बौद्ध धर्माचे पालन करतो

“मी बौद्ध धर्माचे पालन करतो, परंतु मला कोणत्याही एका धर्माचे सखोल धार्मिक ज्ञान नाही. मी खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष आहे आणि हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, शीख अशा सर्व धर्मांवर मी समान श्रद्धा ठेवतो,” असे सरन्यायाधीश गवई यांनी सांगितले.

बालपणीच्या आठवणींना उजाळा

आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना ते पुढे म्हणाले, “हे संस्कार मला माझ्या वडिलांकडून मिळाले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर अनुयायी आणि खरे धर्मनिरपेक्ष विद्वान होते. लहानपणी जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत राजकीय सभांना जात होतो, तेव्हा त्यांचे मित्र म्हणायचे, ‘चला, इथला दर्गा खूप प्रसिद्ध आहे’ किंवा ‘हे गुरुद्वारा पहायलाच हवे’, तेव्हा आम्ही सर्व ठिकाणी न चुकता जात असू. ही सर्वधर्मसमभावाची भावना त्यांनी आमच्यात रुजवली.”

भारतीय संविधानाबद्दल कृतज्ञता

डॉ. आंबेडकर आणि भारतीय संविधानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते भावनिक झाले. ते म्हणाले, “महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या एखाद्या दलित मुलाला भारताचा सरन्यायाधीश होण्याचे स्वप्न पडेल असे यापूर्वी कोणालाच वाटले नसेल. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच आणि त्यातील न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या चार मूलस्तंभांमुळेच मी आज इथवर पोहोचलो. मी माझ्या आयुष्यभर या चार तत्त्वांनुसार जगण्याचा प्रयत्न केला आहे.”

CJI BR Gavai यांनी असा निकाल दिला की इतर न्यायाधीश संतापले, नेमकं प्रकरण काय होतं? जोरदार झाला वादविवाद CJI गवई यांनी संस्थात्मक दृष्टिकोन मांडला

सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाबाबत बोलताना CJI गवई यांनी संस्थात्मक दृष्टिकोन मांडला. “हे न्यायालय फक्त सरन्यायाधीशांचे नाही, तर सर्व न्यायमूर्तींचे आहे. न्यायाधीश, वकील, रजिस्ट्री आणि कर्मचारी यांच्याशिवाय हे न्यायालय चालू शकत नाही. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन आणि SCAORA यांना नेहमी विश्वासात घेऊन त्यांच्या सूचनांचा मान ठेवला पाहिजे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी CJI गवई यांच्या मानवी बाजूचा विशेष उल्लेख केला. “मी त्यांना गेल्या दोन दशकांपासून ओळखतो. सामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठी त्यांचे समर्पण अफाट आहे. ते अत्यंत नम्र, मैत्रीपूर्ण आणि उत्तम यजमान आहेत. निवृत्तीनंतरही त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शन या संस्थेला मिळत राहील, याची खात्री आहे,” असे न्यायमूर्ती कांत यांनी भावूकपणे सांगितले.

सुप्रीम कोर्ट भावूक

SCAORA चे अध्यक्ष, ज्येष्ठ वकील विपिन नायर यांनीही CJI गवई यांचे आभार मानले. विशेषतः तपास यंत्रणांकडून वकिलांना चौकशीसाठी बोलावण्याच्या प्रकरणात न्यायालयाने घेतलेल्या सक्रिय भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली.

२३ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणारे सरन्यायाधीश गवई यांचा शुक्रवार हा सुप्रीम कोर्टातील शेवटचा कामकाजाचा दिवस असेल. न्यायमूर्तीचा निरोपामुळे सुप्रीम कोर्ट भावूक झाले होते.

CJI BR Gavai Retirement Plan: सरन्यायाधीश बी.आर.गवईंनी सांगितला 'रिटायरमेंट' नंतरचा प्लॅन, म्हणाले 'मी कोणतंही...'
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.