पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयांमध्ये नियमित मूळ अभ्यासक्रमासमवेत सहअभ्यासक्रम (को-करिक्युलर्स कोर्स) सुरू केले आहेत. आतापर्यंत हे अभ्यासक्रम कशा पद्धतीने राबवावेत, नेमके काय-काय शिकवावे, याबाबत ठोस आराखडा नसल्याने महाविद्यालये त्यांच्या स्तरावर अभ्यासक्रम निश्चित करून सहअभ्यासक्रम राबवीत आहेत. परिणामी, सहअभ्यासक्रमांच्या गुणात्मक दर्जाचा प्रश्न समोर येत असून संलग्न महाविद्यालयांचे लक्ष आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘सहअभ्यासक्रम धोरणा’कडे लागले असून महाविद्यालयांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.
दीड महिन्यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभा झाली. त्यात महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणाऱ्या सहअभ्यासक्रमाच्या पद्धतीवरून सदस्यांनी विद्यापीठावर ताशेरे ओढले होते. ‘विद्यापीठातर्फे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबविण्यात येणारे सहअभ्यासक्रम तयार करण्यात येईल. हे सहअभ्यासक्रम विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच अपलोड करण्यात येतील,’ अशी माहिती विद्यापीठाच्या अधिसभेत त्यावेळी दिली होती. तसेच, दोन क्रेडिटसाठी असणाऱ्या या अंतर्गत मूल्यमापन अभ्यासक्रमासाठी पहिल्या सत्रात पुरेसा वेळ मिळाला नसेल, तर संबंधित महाविद्यालयांनी अभ्यासक्रमांचे गुणांकन पुढील सत्रात करावे, असेही विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. परंतु, त्यानंतर संबंधित अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांना कोणत्याही सूचना न दिल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
Loni Crime : भाडेकरूंची माहिती न दिल्याने लोणी काळभोरमध्ये घरमालकावर गुन्हा!अधिसभेत सदस्य डॉ. रमेश गायकवाड यांनी सहअभ्यासक्रमाअंतर्गत किती विषयांचा अभ्यासक्रम विषय तज्ज्ञांकडून तयार करून घेतला? असा प्रश्न विचारला होता. त्याला विद्यापीठाच्या वतीने व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी दिलेल्या उत्तरात विद्यापीठाने स्वयंम प्रणालीतून हे अभ्यासक्रम घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य सरकारने स्थापन केलेल्या सुकाणू समितीच्या शिफारशींनुसार पदवी आणि पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम आराखडा, श्रेयांक आराखड्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचनांची शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून अंमलबजावणी होत आहे. सुकाणू समितीच्या शिफारशीनुसार, विविध अभ्यासक्रम तयार करण्याची मुभा दिल्याने विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेंतर्गत विविध २३ सहअभ्यासक्रम महाविद्यालयांना निवडीचे आणि राबविण्याचे स्वातंत्र्य दिल्याचे विद्यापीठाने आधीच दिले आहे. त्यानुसार, महाविद्यालये त्यांच्या स्तरावर सहअभ्यासक्रमांची निवड करत आहेत.
दरम्यान, विद्यापीठाने सहअभ्यासक्रम राबविण्याबाबत कोणतेही धोरण निश्चित केले नसल्याची बाब उघड झाली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या विद्यापीठाने सहअभ्यासक्रम धोरण निश्चित करण्यासाठी पावले उचलण्यात येतील आणि लवकरच धोरण जाहीर करून निश्चित केलेल्या सहअभ्यासक्रमांचा आराखडा तयार करण्यात येईल, असे विद्यापीठाने जाहीर केले होते. आता पहिले सत्र संपले. दुसरे सत्र उंबरठ्यावर असतानाही विद्यापीठाने सहअभ्यासक्रम धोरण अद्याप तयार केले नसल्याने महाविद्यालयांसमोर पेच निर्माण झाला आहे.
‘आराखड्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात’सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर म्हणाले, ‘‘विद्यापीठाच्या अधिसभेत सांगितल्यानुसार सहअभ्यासक्रमाचे धोरण निश्चित करण्यात येत आहे. बहुतांश सहअभ्यासक्रमांचा आराखडा तयार आहे. संबंधित अभ्यास मंडळांमार्फत विविध पातळ्यांवर तज्ज्ञांच्या बैठका घेण्यात येत आहेत. सहअभ्यासक्रमांचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच अभ्यासक्रम विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येतील. दुसरे सत्र सुरू होण्यापूर्वी सहअभ्यासक्रमाचा आराखडा तयार झालेला असेल. या दोन क्रेडिटसाठी असणाऱ्या अंतर्गत मूल्यमापन सहअभ्यासक्रमासाठी
पहिल्या सत्रात पुरेसा वेळ मिळाला नसल्यास, संबंधित महाविद्यालयांनी या अभ्यासक्रमांचे गुणांकन पुढील सत्रात करावे, अशा सूचनाही महाविद्यालयांना दिल्या आहेत.’’