राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, येत्या 2 डिसेंबर रोजी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर त्यानंतर राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यात आहे. महापालिका निवडणूक कार्यक्रमाची देखील लवकरच घोषणा होऊ शकते. दरम्यान दुसरीकडे मात्र महायुतीमधील धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपात मोठं इनकमिंग सुरू आहे, याचा फटका हा विरोधकांना बसण्याऐवजी सर्वात जास्त शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटालाच बसत आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
शिवसेना शिंदे गट महायुतीमध्ये नाराज असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तर ही नाराजी आणखी वाढल्याचं पहायला मिळत आहे, शिवसेना शिंदे गटातून मोठ्या प्रमाणात भाजपात पक्षप्रेवश होत आहेत. यावरून शिवसेना शिंदे गट नाराज आहे, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घालून आपली नाराजी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काही दिवसांपूर्वी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, सध्या महायुतीमध्ये सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. दरम्यान आता राजकीय वर्तुळात मोठी बातमी समोर येत आहे.
भाजपचे प्रदेश सचिटणीस विजय चौधरी यांनी मोठी घोषणा केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात आता शिवसेना शिंदे गटासोबत कधीही युती होणार नाही, अशी घोषणा विजय चौधरी यांनी केली आहे. शिवसेना शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्ते भाजपाच्या उमेदवारांना धमकावत आहेत. आमच्या उमेदवारांना धमक्या देणाऱ्या लोकांना जशास तसं उत्तर देऊ, नंदुरबार नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाकडून अनेक वर्षापासून भ्रष्टाचार केला जात आहे, असा आरोपही यावेळी विजय चौधरी यांनी केला आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. देशविघाती कृत करणाऱ्या लोकांवर कारवाई होते , मात्र त्याच लोकांचं शिवसेना शिंदे गटाचे आमदार समर्थन करतात, असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान उद्या नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिकेच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत. शहादा शहरात फडणवीस यांची सभा होणार असून, ही सभा ऐतिहासिक सभा होईल, अशी माहितीही यावेळी विजय चौधरी यांनी दिली आहे.