मुंबई भाजप अध्यक्षांनी पोलिसांची लाज काढली, आई-बहिणीवरून शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल; मनसे नेत्याचा गंभीर आरोप
Tv9 Marathi November 23, 2025 06:45 PM

राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे, तर ३ डिसेंबरला लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. राज्यात निवडणुकांचा धुराळा पाहायला मिळत आहे. यानंतर आता सध्या मुंबई महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. सध्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यातच आता मनसे नेते अखिल चित्रे यांनी भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अमित साटम हे त्यांच्या पदावर राहण्याच्या योग्यतेचे नाही, असा आरोप अखिल चित्रे यांनी केला आहे.

अखिल चित्रे यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अमित साटम यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अमित साटम हे मुंबई पोलिसांची लाज काढताना, त्यांना शिवीगाळ करताना दिसत आहेत. तसेच यावेळी अमित साटम हे गरीब उत्तर भारतीयांना जीवानिशी मारण्याची धमकी देतानाही दिसत आहे. यावरुन अखिल चित्रे यांनी अमित साटम यांच्यासारख्या व्यक्तीला मुंबई अध्यक्षपदी ठेवणे कितपत योग्य आहे, असा सवाल केला आहे.

अखिल चित्रे काय म्हणाले?

मुंबई पोलिसांची लाज काढली जात असेल, गरीब उत्तर भारतीयांना जीवानिशी मारण्याची धमकी दिली जात असेल आणि ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमी’ म्हणणाऱ्यांकडून आई-बहिणींवरून अर्वाच्य, अश्लाघ्य शिव्या ऐकाव्या लागणार असतील… तर अशा अमानुष, शिवराळ अमित साटम इसमाला मुंबई भाजपा अध्यक्षपदी ठेवणं कितपत योग्य? ‘देवा’ आता तूच भाजपाला सुबुद्धी दे… नाहीतर मराठी संस्कारात वाढलेले मुंबईकरच भाजपाला काही दिवसात वठणीवर आणतील !, असे अखिल चित्रे यांनी म्हटले आहे.

मुंबई पोलिसांची लाज काढली जात असेल, गरीब उत्तर भारतीयांना जीवानिशी मारण्याची धमकी दिली जात असेल आणि ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमी’ म्हणणाऱ्यांकडून आई-बहिणींवरून अर्वाच्य, अश्लाघ्य शिव्या ऐकाव्या लागणार असतील… तर अशा अमानुष, शिवराळ @AmeetSatam इसमाला @BJP4Mumbai मुंबई भाजपा… pic.twitter.com/K49XuCgpg6

— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485)

दरम्यान अमित साटम हे पूर्वीपासूनच वादग्रस्त वक्तव्ये आणि कथित गैरवर्तनामुळे चर्चेत राहिले आहेत. २०१७-१८ दरम्यान साटम यांच्यावर बीएमसी कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचे आणि धमक्या दिल्याचा आरोप होता. बीएमसी कर्मचाऱ्याला अपशब्द वापरल्याची कथित ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. तसेच २०१७ मध्ये त्यांच्यावर फेरीवाल्यांना मारहाण आणि पोलिसांशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. आता या नवीन व्हिडीओमुळे मुंबई भाजपसाठी हा एक मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

अखिल चित्रे यांच्या या गंभीर आरोपांवर भाजप प्रदेशाध्यक्ष किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच अमित साटम यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.