मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेवर बनावट तिकिटांचा धडाका
esakal November 23, 2025 06:45 PM

मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेवर बनावट तिकिटांचा धडाका
१५ रुपयांच्या तिकिटाचा बनवला २,२०५ रुपयांचा पास; एका महिन्यात चार प्रकरणांचा पर्दाफाश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः पश्चिम रेल्वेत बनावट तिकिटांच्या प्रकारात मोठी वाढ होत असून तिकीट तपासणी पथकाने नुकतेच चार धक्कादायक प्रकरणांचा भांडाफोड केला आहे. यात सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे एका प्रवाशाने १५ रुपयांच्या विनावातानुकूलित लोकल तिकिटाला ग्राफिक डिझाइनिंगच्या मदतीने एसी लोकलचा २,२०५ रुपयांचा पास बनवले होते. तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला आणि बोरिवली जीआरपीने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने चार महत्त्वाचे प्रकार उघडकीस आणले. रेल्वे प्रशासनानुसार, बनावट आरक्षण तिकिटे तयार करणे, सवलतीच्या तिकिटांचा गैरवापर करणे, लोकल तिकिटांना एडिट करून बदलणे आणि अधिकृत एजंटच्या नावाखाली खोटे तिकीट विकणे असे विविध प्रकार आढळून आले. या तपास मोहिमेत निरीक्षक प्रदीप कुमार, मोहम्मद कुरेशी, अब्दुल अजीज आणि साई प्रसाद यांनी सतर्कता दाखवत सर्व प्रकरणे वेळेत पकडली. तिकीट तपासणी पथकाने सतत मिळालेल्या माहितीच्या आधारे स्टेशन स्तरावर विशेष तपासणी मोहीम राबवली होती.

तत्काळ तिकिटांतही चलाखी
दुसऱ्या प्रकरणात एका प्रवाशाने ९२० रुपयांच्या तत्काळ तिकिटाच्या नावाखाली २,९०० रुपये देऊन बनावट तिकीट खरेदी केले. अधिकृत एजंटच्या नावाचा वापर करून त्या तिकिटावर वॉटरमार्कदेखील नव्हते. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिकीट तपासणीदरम्यान विसंगती लक्षात घेतली आणि या प्रवाशाला तत्काळ बोरिवली येथे ताब्यात घेऊन जीआरपीकडे सोपवले. तपासात हे तिकीट संगणकावर तयार केलेले असल्याचे स्पष्ट झाले.

दिव्यांग कोट्याचा गैरवापर
तिसऱ्या प्रकरणात दोन प्रवासी एक्स्प्रेसच्या थर्ड एसी कोचमधून प्रवास करताना पकडले. दोघांची तिकिटे दिव्यांग कोट्याखाली काढलेली होती. तपासात दोघेही दिव्यांग नसल्याचे स्पष्ट झाले. या गैरवापरामुळे रेल्वेला महसुलाचे मोठे नुकसान होते. या प्रवाशांवरदेखील जीआरपीच्या मदतीने कारवाई करण्यात आली.

एडिटिंगचा आणखी एक प्रकार
चौथ्या प्रकरणात एका प्रवाशाने लोकल तिकिटावर ग्राफिक एडिटिंग करून ते उच्च श्रेणीचे तिकीट असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. रेल्वे तपासणीसांनी तिकिटावर दिसणाऱ्या चुकीचा फॉन्ट, रंग आणि क्रमांकामुळे तत्काळ शंका घेतली. तपासात त्यातील एडिटिंग उघड झाले.

रेल्वे प्रशासनाचा इशारा
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. फसवणुकीचे प्रकार थांबावेत, यासाठी तिकीट तपासणी अधिकाऱ्यांची उपस्थिती वाढवण्यात आली आहे. स्टेशन परिसरात आणि गाड्यांमध्ये विशेष तपासणी मोहीम सुरू ठेवली जाणार असल्याचा इशारा पश्चिम रेल्वेने दिला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.