Womens Blind T20 World Cup Final : आणखी एक कप, नेपाळचा धुव्वा उडवत टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन
GH News November 23, 2025 07:11 PM

वूमन्स टीम इंडियाने अवघ्या काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्यानंतर आता अवघ्या काही दिवसांनी भारताच्या मुलींनी इतिहास रचला आहे. भारतीय दृष्टीहीन महिला संघाने टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. वूमन्स इंडियाने अंतिम सामन्यात नेपाळवर 7 विकेट्सने धुव्वा उडवत वर्ल्ड कप ट्रॉफी मिळवली. भारतीय संघाने या स्पर्धेत जशी सुरुवात केली होती तसाच शेवटही केला. भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहिला. भारताच्या या कामगिरीनंतर सर्वच स्तरातून वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंचं अभिनंदन केलं जात आहे.

महाअंतिम सामन्यात नक्की काय झाला?

महाअंतिम सामन्यातील पहिलाच अर्थात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. भारतीय कर्णधाराने नेपाळला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. भारतीय गोलंदाजांनी नेपाळला 6 च्या रनरेटनेही धावा करुन दिल्या नाहीत. भारताने नेपाळला 20 ओव्हरमध्ये 5 झटके देत 114 धावांवर रोखलं. नेपाळसाठी सरिता घिमिरे आणि बिमला राय या दोघींनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. सरिताने 35 तर बिमलाने 26 धावांचं योगदान दिलं. या दोघींव्यतिरिक्त एकीलाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. टीम इंडियासाठी जमुनी राणी टुडू आणि अनु कुमारी या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

टीम इंडियाचा धमाकेदार विजय

भारताने 115 धावांचं आव्हान सहज पूर्ण करत एकतर्फी विजय मिळवला. भारताने हे आव्हान 47 बॉलआधी आणि 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारताने 12.1 ओव्हरमध्येच विजय साकारला.

भारताला विजयी करण्यात फुला सरेन आणि करुणा के या दोघींनी बॅटिंगने प्रमुख योगदान दिलं. फुलाने 27 बॉलमध्ये नॉट आऊट 44 रन्स केल्या. तर करुणा के हीने 27 चेंडूंमध्ये 42 धावा केल्या. तसेच बसंती हांसदा हीने नाबाद 13 धावा करत भारताला वर्ल्ड कप ट्रॉफीपर्यंत पोहचवण्यात मदत केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.