60 लाख मृतदेहाचे दफन, या ठिकाणी आहे जगातील सर्वात मोठी दफनभूमी
Tv9 Marathi November 23, 2025 08:45 PM

पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला हे माहिती आहे की मृत्यू हे अंतिम सत्य आहे. एके दिवशी प्रत्येकजण मरणार आहे. मृत्यूनंतर प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. इस्लाम धर्मात मृतदेह दफन करण्याची परंपरा आहे. आज आपण जगातील सर्वात मोठी स्मशानभूमी कुठे आहे याची माहिती जाणून घेणार आहोत. कारण या दफनभूमीत तब्बल 60 लाख मृतदेह दफन केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वाडी अल-सलाम

जगातील सर्वात मोठी दफनभूमी ही इराकमधील नजफ या पवित्र शहरात आहे. या या दफनभूमीला वाडी अल-सलाम (शांतीची दरी) म्हणतात. 2023 च्या आकडेवारीनुसार या दफनभूमीत 60 लाखांहून अधिक मृतदेह दफन करण्यात आले आहेत. इस्लाम धर्मातील अनेक पैगंबर, शास्त्रज्ञ आणि राजघराण्यातील सदस्यांना वाडी अल-सलाम या स्मशानभूमीत दफन करण्यात आले आहे.

3677 एकराची दफनभूमी

वाडी अल-सलाम ही दफनभूमी नजफ शहराच्या मध्यभागापासून वायव्य दिशेकडे पसरलेली आहे. ही दफनभूमी शहराच्या एकूण क्षेत्रफळाच्या 13 टक्के भागावर पसरलेली आहे. ही दफनभूमी 1485.5 हेक्टर म्हणजेच 3677 एकरावर आहे. युनेस्कोच्या मते, या दफनभूमीत 1400 वर्षांपासून म्हणजेच मध्ययुगापासून मृतदेहांना दफन केले जात आहे. येथे लाखो कबरी आहेत. तसेच काही लोकांनी गोपनीय ठिकाणीही दफन करण्यात आलेले आहे.

राजांनीही याच ठिकाणी दफन करण्यात आलेले आहे

युनेस्कोच्या मते अल-हिरा राजे आणि अल-ससानिद काळातील राजांनाही या स्मशानभूमीत दफन करण्यात आलेले आहे. हमदानीद, फातिमिद, अल-बुवेहिया, सफाविया, काजर आणि जलायरिया या राज्यांचे सुलतान आणि राजपुत्रांनाही येथे दफन करण्यात आले आहे. तसेच इमाम अली इब्न अबी तालिब यांचीही कबर या ठिकाणी आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स

अल-जझीराने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील शिया मुस्लिमांसाठी ही पवित्र दफनभूमी आहे. या ठिकाणी दरवर्षी अंदाजे 50,000 पेक्षा जास्त लोकांचे मृतदेह दफन करण्यात येतात. येथे कबर खोदण्यासाठी 8300 रुपयांचा खर्च येतो. जगातील सर्वात मोठी दफनभूमी म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये वाडी अल-सलामची नोंद आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.