टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. त्यानंतर उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. भारताने या मालिकेसाठी कर्णधार आणि उपकर्णधार बदलले आहेत. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. या मालिकेत भारताच्या नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार आणि पहिला सामना कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
नियमित कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस या दोघांनाही दुखापतीमुळे या एकदिवसीय मालिकेला मुकावं लागलं आहे. श्रेयस अय्यर याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कॅच घेताना दुखापत झाली होती. त्यामुळे श्रेयसची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवड करण्यात आलेली नाही. तर शुबमनला कोलकातातील इडन गार्डन्समधील पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी बॅटिंग करताना मानेला दुखापत झाली. त्यामुळे शुबमनला दुसऱ्या कसोटीनंतर एकदिवसीय मालिकेत खेळता येणार नाही.
शुबमन गिल याच्या अनुपस्थितीत केएल राहुल भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. केएल राहुल याच्या नेतृत्वाची संधी मिळणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. त्यामुळे आता केएलवर चांगली बॅटिंग करण्यासह नेतृत्व करण्याची दुहेरी जबाबदारी असणार आहे.
भारतीय संघात अनुभवी ऑलराउंडर रवींद्र जडेजा याचं कमबॅक झालं आहे. जडेजा अखेरीस चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळला होता. जडेजाला ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजमध्ये संधी देण्यात आली नव्हती. मात्र जडेजाचा समावेश करण्यात आला आहे.
जडेजा व्यतिरिक्त भारतीय संघात विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याचं पुनरागमन झालं आहे. पंतही चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघात परतला आहे. मात्र पंतला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत केएल राहुल याच्यामुळे एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे आता पंतला संधी मिळणार की नाही? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पहिला सामना, 30 नोव्हेंबर, रांची
दुसरा सामना, 3 डिसेंबर, रायपूर
तिसरा सामना, 6 डिसेंबर, विशाखापट्टणम
3 सामने आणि 15 खेळाडू
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : केएल राहुल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह आणि ध्रुव जुरेल.