पिंपरी, ता. ७ ः पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि जलदिंडी प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून, तसेच विलो मॅथर ॲण्ड प्लाट यांच्या अर्थसहाय्याने साकारण्यात आलेल्या ‘माझी नदी-माझी जबाबदारी’ या नदी दालनाचे उद्घाटन सोमवारी (ता. ८) सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. नदी संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी हे दालन महत्त्वाचे ठरणार आहे. या दालनामध्ये अप्पर भीमा खोरे, परिसरातील प्रमुख नद्या, जिल्ह्यातील प्रमुख धरे यांची माहिती मिळेल. पवना नदीचे अत्याधुनिक त्रिमितीय (थ्रीडी) मॉडेल आकर्षण असेल. दालनात पवना नदीचा इतिहास, भूगोल, पाण्याच्या गुणवत्तेचे निकष, जलशुद्धीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर आकर्षक आणि शैक्षणिक सादरीकरणे करण्यात आली आहेत. पवना धरणापासून दापोडीपर्यंतच्या संपूर्ण नदीपात्राची प्रतिकृतीही लक्षवेधी ठरणार आहे. नागरिक, विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन सायन्स पार्कचे संचालक प्रवीण तुपे आणि जलदिंडी प्रतिष्ठानचे विश्वस्त राजीव भावसार यांनी केले.
---------