Chandoli Wild : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चांदोली अभयारण्यात ‘ऑपरेशन तारा (Tiger Augmentation and Range Expansion)’ या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत महाराष्ट्र वन विभागाने काल (ता.०९) सायंकाळी ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरित करण्यात आलेली दोन वर्षांची मादी वाघीण T7-S2 हिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यान येथील सोनारली अनुकूलन (Acclimatisation) कुंपणात सॉफ्ट रिलिज करण्यात आले.
ही वाघीण ८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा कोअर रेंज, पांढरपौनी परिसरातून सुरक्षितपणे पकडण्यात आली होती. त्यांनंतर तिची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात करून तीला सोडण्यात आले. दरम्यान ताडोबा जंगलातून दुसरी वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आली आहे.
पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) व प्रमुख – रॅपिड रेस्क्यू टीमचे डॉ. रविकांत खोब्रागडे म्हणाले की, "ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प यांनी केलेल्या तपासणीत वाघीण पूर्णतः तंदुरुस्त, निरोगी व स्थलांतरास योग्य असल्याचे निदर्शनास आले. सॉफ्ट रिलिज पद्धतीमुळे वाघीण सुरक्षित कुंपणात राहून तेथील भूभाग, भक्ष्य प्रजाती व स्थानिक पर्यावरणाशी हळूहळू जुळवून घेते. यामुळे खुल्या जंगलात सोडण्यापूर्वी तिचे सुरक्षित पुनर्स्थापन, नैसर्गिक हालचाल व क्षेत्रीय स्थैर्य अधिक प्रभावीपणे साध्य होते".
View this post on InstagramA post shared by Sandeep Shirguppe (@sandeepshirguppe)
ताडोबा प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला (IFS) म्हणाले, “T7-S2 ही तरुण, सशक्त व नैसर्गिकरीत्या भ्रमणशील मादी असून तिचे आरोग्य अत्युत्तम आहे. ‘ऑपरेशन तारा’तील ही दुसरी मादी असून, तिची उपस्थिती सह्याद्रीतील वाघ संवर्धन अधिक बळकट करेल.”
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक श्री. तुषार चव्हाण (IFS) यांनी सांगितले, “ही वाघीण पूर्ण निरोगी असून चांदोली परिसरात तिच्यासाठी पुरेशा प्रमाणात भक्ष्य आणि सुरक्षित अधिवास उपलब्ध आहे. आमची क्षेत्रीय पथके २४x७ देखरेखीकरिता सज्ज आहेत.”
Kolhapur Chandoli News : चांदोली प्रकल्पग्रस्तांसाठी मोठा निर्णय; कलम ११ ते १४ लागू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना महिन्यात अहवाल देण्याचे आदेशप्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री. एम. श्रीनिवास रेड्डी (IFS) यांनी या यशाला ताडोबा–सह्याद्रीमधील उत्तम समन्वय आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या कौशल्याला दिले.
दरम्यान, भारतीय वन्यजीव संस्था (WII) या संपूर्ण प्रक्रियेचे शास्त्रीय मार्गदर्शन करीत आहे. वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. के. रमेश आणि फील्ड बायोलॉजिस्ट आकाश पाटील हे वाघीणीच्या वर्तणूक निरीक्षणाचा ताबा सांभाळत आहेत. राष्ट्रीय पातळीवर या मोहिमेचे निरीक्षण NTCA करत असून, पकड, वाहतूक आणि सॉफ्ट रिलिजची संपूर्ण प्रक्रिया ताडोबा रॅपिड रेस्क्यू टीम व कोलारा रेंजच्या कर्मचाऱ्यांनी समन्वयाने पार पाडली. ही संपूर्ण मोहिम TATR आणि STR यांच्या संयुक्त पथकांद्वारे राबविली जात आहे.