सुदृढ अन्नमय कोश
esakal December 10, 2025 03:45 PM

मृदुला अडावदकर( सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ )

नव्या वाटा

बालकांचा ‘पंचकोशात्मक’ विकास ही संकल्पना मध्यभागी ठेवून त्या भोवती त्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ध्येये, उद्दिष्टे यांची वेगवेगळ्या क्षेत्रानुसार मांडणी केलेली आहे. ‘शरीर आद्यम खलु धर्म साधनम।’ असं म्हटलं आहे. आपल्या वाट्याला आलेलं कोणतंही कर्तव्य पूर्ण करायचं असेल, तर आपल्याला मिळालेलं शरीर आरोग्यपूर्ण राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यानुसार बालकाच्या जन्मानंतर सर्वांत महत्त्वाचा विकासाचा टप्पा म्हणजे त्याचा अन्नमय कोश. यामध्ये प्रत्यक्ष दिसणारे शरीर त्याचे अवयव तसेच रक्त मांस इत्यादी धातू म्हणजेच शरीरातल्या वेगवेगळ्या उती निरोगी आणि बलवान होण्याला महत्त्व दिलेलं आहे. त्यासाठी ‘युक्ताहार विहार’ हे व्रत तर सर्व विद्यार्थ्यांनाच घ्यावं लागतं. म्हणजे मिळेल तो आहार योग्य प्रमाणात घेणं.

खेळाचा तास

अगोदरच्या पिढ्यांमध्ये मुलं शाळेच्या वेळेपूर्वी आणि शाळा सुटल्यानंतर शाळेच्या मैदानावर खेळून, धुळीत माखून मग घरी जायची अशी सर्वसाधारण पद्धत होती. त्या खेळासाठी कधी-कधी शाळेतलेच क्रीडा शिक्षक, फारतर एखादे दुसरे प्रशिक्षक असायचे किंवा बहुधा नसायचेच. बहुधा मुलं त्यांना हवं ते खेळायची, भांडायची, मारामाऱ्या करायची, मित्रांच्या मध्यस्थीनेच पुन्हा एकत्र यायची. त्यामुळेच तर ‘शाळेपासूनची मैत्री’ म्हणजेच मैत्रीचा ‘वरचा दर्जा!’ अज्ञानात सुख म्हणून तेव्हाचे पालक बरेच रिलॅक्स(!) मुलांचा शारीरिक विकास होण्याच्या दृष्टीने लहानपणापासूनच शाळेमध्ये खेळ आणि शारीरिक शिक्षण हे विषय अनिवार्य आहेतच प्राथमिक स्तरावर आणि माध्यमिक स्तरावर विशेष शिक्षकही या विषयासाठी नेमलेले असतात आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा या विषयाचे तास वेळापत्रकात दिलेले असतात त्याप्रमाणे घेतले जातात. काही शाळांमध्ये मात्र विद्यार्थ्यांना रोज ठराविक वेळ मैदानी खेळ खेळता यावे यासाठी खास वेगवेगळ्या क्रीडा प्रकारचे तज्ज्ञ शिक्षक नेमलेले असतात. अर्थात त्याचं अतिरिक्त शुल्क भरावं लागतं.

मनोमय कोशाकडे

क्रीडा (खेळ) आणि शारीरिक शिक्षण हे वरकरणी एकच वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र तसं नाही. शारीरिक विकासासोबत सामाजिक विकासही साधण्यामध्ये मुलांचे खेळ मोठी भूमिका बजावतात. तथापि शारीरिक शिक्षण हे त्याही पलीकडे मनोमय कोशापर्यंत पोहोचू शकतं. लहान वयात सकाळपासून झोपेपर्यंतची आपली दिनचर्या, आजूबाजूची परिस्थिती या सर्वांचा मेंदूच्या विकासात मोठा वाटा असतो. खेळ आपल्याला बहिर्मुख करतील काही प्रमाणात टीमवर्क, स्पर्धा, यश-अपयश यांची चव चाखायला देतात. वेगवेगळ्या क्रीडाप्रकाराप्रमाणे त्यात विशिष्ट शारीरिक विकास सुद्धा साधला जातो. परंतु शारीरिक शिक्षण हे अंतर्मुख करणारे असते.

शाळेतली कवायत असो, योगसाधना असो वा झुंबा, तत्त्व एकच! लयबद्ध हालचालीतून मेंदूला प्रेरित करणे. स्वतःच्या हालचालींवर नियंत्रण मिळविणे, त्यात वेगवेगळ्या स्नायूंना मिळणारे ताण किंवा रिलॅक्सेशन अनुभवणे. श्वास नियंत्रित करून शरीराच्या लयबद्ध हालचालीसोबत त्याची लय जुळवून घेणे. यातून आपल्याला स्वतःला आपल्या मनाकडे जाणारी पायवाट हळूहळू दिसायला लागते. ‘स्व’ची ओळख होण्याच्या प्रवासाची ही सुरुवात असते. अन्नमय कोश, प्राणमय कोशाकडून मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश अशा एकेक करून व्यक्तिमत्त्वाच्या पाकळ्या उलगडू लागतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.