पिंपरी, ता. ९ : शहरातील अन्नधान्य वितरण व्यवस्थेत एक महत्त्वाचा बदल होणार आहे. शिधापत्रिकेवर मिळणारे ज्वारीचे वाटप येत्या जानेवारीपासून थांबणार असल्याची माहिती चिंचवड परिमंडळ अधिकारी विजयकुमार क्षीरसागर यांनी दिली. गेल्या दोन महिन्यांपासून विविध स्वस्त धान्य दुकानांतून ज्वारीचे वाटप करण्यात येत होते. नागरिकांना गहू व तांदळासोबत पर्यायी धान्य म्हणून ज्वारी उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम होता.
या वाटप काळात अनेक नागरिकांनी मिळणाऱ्या ज्वारीच्या गुणवत्तेबाबत तक्रारी केल्या. काही ठिकाणी धान्य नीट स्वच्छ नसे, तर काहींनी ‘ज्वारी खाण्यायोग्य नाही’ अशी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे काही ग्राहकांनी या वाटपाचा फायदा झाल्याचे सांगत ज्वारीचे वितरण पुढेही सुरू ठेवावे, अशी मागणी केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून पुढील महिन्यांसाठी ज्वारीचा कोटा उपलब्धतेबाबत कोणताही आदेश किंवा सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे सध्याचे ज्वारी वितरण फक्त दोन महिन्यापुरतेच मर्यादित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोटा न मिळाल्याने जानेवारीपासून ज्वारी देणे बंद होणार असून, नियमित शिधावाटप केवळ गहू, तांदूळ आणि इतर ठरलेल्या धान्यापुरतेच राहील.