Blair Tickner: न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज आणि रेड बॉल क्रिकेटमधील सर्वौत्तम गोलंदाजांपैकी एक असलेल्या ब्लेयर टिकनरसोबत दुर्घटना घडली. ब्लेयर टिकनरने विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला आहे. न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजीची ताकद त्याच्यामुळे वाढली आहे. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला मैदानातून थेट रुग्णालयात नेण्याची वेळ आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ब्लेयर टिकनरने चार विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर फाइन लेगवर क्षेत्ररक्षणाला उभा होता. यावेळी त्याने चौकार अडवण्यासाठी उडी मारली. पण क्षेत्ररक्षण करताना डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. तसेच त्याचा डावा खांदा डिसलोकेट झाला. त्यामुळे त्याला वेदना असह्य झाल्या. त्याला उठायलाच झालं नाही.
ब्लेयर टिकनर तसाच पडून असल्याचं पाहून न्यूझीलंडच्या फिजिओंनी मैदानात धाव घेतली. त्यानंतर त्यांना कळलं की त्याचा खांदा डिसलोकेट झाला आहे. त्यानंतर क्रिकेट मैदानात स्ट्रेचर आणलं आणि तेथूनच त्याला रुग्णालयात दाखल केलं गेलं. आता त्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खरं ब्लेयर टिकनरने दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पदार्पण केलं होतं. त्याला चार विकेटही मिळाल्या होत्या. पण नशिब पुन्हा एकदा त्याच्यावर रूसलं आहे. त्याची दुखापत पाहता त्याला तीन चार महिने मैदानापासून दूर राहावं लागेल असं दिसत आहे.
ब्लेयर टिकनर सध्या कौटुंबिकदृष्ट्या अडचणीत आहे. मागच्या वर्षी डर्बीशरसाठी काउंटी खेळत असताना त्याच्या पत्नीला ब्लड कँसर झाल्यंच निष्पन्न झालं होतं. त्याची पत्नी तेव्हा गरोदरही होती. आता त्याच्या पत्नीवर कीमोथेरपी सुरु आहे. असं असताना ब्लेयर टिकनर दुखापतग्रस्त झाल्याने कुटुंबावर संकट ओढावलं आहे. आता त्यातून लवकर बरा व्हावा यासाठी क्रीडाप्रेमी प्रार्थना करत आहेत.
दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ न्यूझीलंडच्या नावावर राहिला. पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 205 धावांवर तंबूत परतला. तर पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने विना बाद 24 धावा केल्या होत्या. टॉम लॅथम नाबाद 7 आणि डेव्हॉन कॉनवे नाबाद 16 धावांवर खेळत आहे.