US Tariff : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वी जगातील बहुतांशी देशांवर कर लादला होता. अमेरिकेने भारतावरही 50 टक्के कर लावला होता. यामुळे अमेरिकेला जगभरातील देशांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. अशातच आता याच टॅरिफमुळे डोनाल्ड ट्रम्प यांची डोकेदुखी वाढली आहे. अमेरिकन सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावर निर्णय देणार आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
टॅरिफबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करताना लिहिले की, टॅरिफच्या विरोधातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला इतिहासातील सर्वात मोठा धोका असेल. जर सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला तर अमेरिका आर्थिकदृष्ट्या कमकुवत होईल. ज्या वेगाने कर लादला गेला त्यामुळे देशाची राष्ट्रीय सुरक्षा वाढली आहे. यामुळे अमेरिका जगातील सर्वात आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली देश बनलो आहोत.
जानेवारी 2025 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. तेव्हापासून ट्रम्प यांची लोकप्रियता घटली आहे. रोज लागणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. टॅरिफमुळे महागाई वाढल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. सप्टेंबरमध्ये अमेरिकेतील महागाई 2.8 टक्क्यांपर्यंत वाढली होती. यावर बोलताना ट्रम्प यांच्या माजी सहकारी मार्जोरी टेलर ग्रीन यांनी म्हटले होते की, ‘ट्रम्प परवडणाऱ्या वस्तूंच्या किमतींकडे लक्ष देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.’
दरम्यान, 5 नोव्हेंबरपासून सर्वोच्च न्यायालयाने डोनाल्ट ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाची घटनात्मक वैधता तपासण्यास सुरुवात केली आहे. मात्र न्यायालय यावर आपला अंतिम निर्णय कधी देणार याची तारीख अद्याप समोर आलेली नाहीत. मात्र आगामी काळात लवकरच याबाबत निर्णय जाहीर होऊ शकतो. याआधी अनेक मोठ्या कंपन्यांनी आणि डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांनी देखील यूएस कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेडमध्ये टॅरिफ विरोधात खटले दाखल केले आहेत. विरोधकांच्या मते टॅरिफ असंवैधानिक आहे, मात्र आता सुप्रीम कोर्ट यावर कार निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.