वाढवणचा विकास स्थानिकांच्या मदतीने
जेएनपीएचे नवे अध्यक्ष गौरव दयाल यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० : केंद्र सरकारतर्फे विकसित होणाऱ्या वाढवण बंदराचा विकास स्थानिकांना विश्वासात घेऊन केला जाणार आहे. या बंदरासाठी लागणारी जमीन ग्रामस्थांना विश्वासात घेऊन केली जाणार असल्याचे जेएनपीएचे नवे अध्यक्ष गौरव दयाल यांनी दिली आहे.
उत्तर प्रदेश केडरचे सनदी अधिकारी म्हणून दयाल पहिल्यांदाच जेएनपीए प्रशासनाचा कामकाज सांभाळणार आहेत. अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर दयाल यांनी नुकतेच जेएनपीए प्रशासनाचे कामकाज समजून घेतले. केंद्र व राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबरोबर वाढवण बंदराच्या जागेला भेट देऊन माहिती घेतली. वाढवण बंदरामुळे व्यापाराच्या व्याख्या बदलणार आहेत. या बंदरामुळे जगाच्या नकाशावर भारताचा आयात-निर्यातीचा जलमार्गे होणारा व्यवसाय एका वेगळ्या उंचीवर देशाला ओळख प्रदान करेल, असा विश्वासही दयाल त्यांनी व्यक्त केला. या वेळी जेएनपीएच्या विकासासोबतच वाढवण बंदराच्या पायाभरणीसाठी ३० हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बंदरामध्ये पहिले प्राधान्य स्थानिकांना असणार आहे. तसेच परिसराचा कायपालट होणार असल्याचा विश्वासही दयाल यांनी व्यक्त केला आहे.
------------------------------
राममंदिराच्या उभारणीत योगदान
दयाल यांनी उत्तर प्रदेशमध्ये आयोध्य प्रशासनाचे आयुक्त म्हणून यशस्वी कामकाज केले आहे. राममंदिराच्या उभारणी, अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. बरेली येथे जिल्हाधिकारी दयाल यांनी राबवलेली ‘से नो टु करप्शन’ मोहीम चर्चेची ठरली होती. त्याच धर्तीवर जेएनपीए प्रशासनामध्येही अनेक महत्त्वाचे बदल होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
------------------------------------
उपाध्यक्षपदी रवीशकुमार सिंह
जेएनपीएच्या उपाध्यक्षपदी रवीशकुमार सिंह यांची नियुक्ती झाली. जेएनपीएतील प्रशासकीय भवनात मंगळवारी त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. गौरव दयाल यांनी त्यांचे स्वागत केले. सिंह यांनी यापूर्वी मध्य रेल्वेमध्ये काम केले आहे. रेल्वेमध्ये त्यांनी कार्यक्षमता उपक्रमांचे नेतृत्व केले आहे.